सावधान..! कोरचीत बिबट्या पोलिस ठाण्यापर्यंत पोहाेचला
By गेापाल लाजुरकर | Published: December 6, 2023 08:55 PM2023-12-06T20:55:46+5:302023-12-06T20:55:54+5:30
नागरिकांमध्ये दहशत : बंदाेबस्त करण्याची मागणी
गडचिराेली : कोरची शहरातील पोलिस स्टेशन जंगलालगत आहे. या परिसरात रात्रीच्या सुमारास अन्य वन्यप्राणी दिसून येतात. परंतु बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास कर्तव्यावरील पाेलिस कर्मचाऱ्यांना बिबट मुक्तपणे संचार करताना आढळून आला. त्यामुळे या परिसरातील पाेलिस कर्मचारी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पाेलिस स्टेशनच्या बाहेरील आवारात बिबट दिसून आल्याने त्याचा लवकर बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
कोरची शहराच्या चारही दिशेने जंगल असल्याने जंगलातील प्राण्यांचा मुक्त संचार असताे. या परिसरात रानटी प्राणी अधूनमधून दृष्टीस पडतात. परंतु मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे. विशेष म्हणजे, पोलिस स्टेशन परिसरात तहसील कार्यालय, वनश्री महाविद्यालय, शासकीय आश्रम शाळा, पंचायत समिती कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गट साधन केंद्र आदी शासकीय तसेच निम शासकीय कार्यालये आहेत. याशिवाय परिसरात अनेक लाेकांची घरे आहेत. रात्री उशिरापर्यंत कोरची-भीमपूर मार्गाने नागरिकांची ये-जा सुरू असते, तसेच पहाटे थंडीच्या दिवसात फिरायला व व्यायाम करण्यासाठी नागरिक जात असतात. सकाळी काॅलेजमध्ये विद्यार्थी जातात. याशिवाय जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गरीब व गरजू नागरिक जातात. बिबट्यापासून त्यांना धोका हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेडगाव वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
तीन बिबट्यांचा वावर
काेरची तालुक्याच्या जंगल परिसरात जवळपास तीन बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता बेडगाव वनपरिक्षेत्राचे एल. एम. ठाकरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यापूर्वी टेमली व सोनपूर येथील दोन गायींना बिबट्यांनी ठार केले. त्यामुळे या बिबट्यांचा बंदोबस्त होईपर्यंत नागरिकांनी समूहाने फिरावे, एकटे फिरू नये, सरपण गोळा करायला जायचे असेल तर समूहाने जावे. एकटे जाऊ नये,असे आवाहन वन विभागाने केले.