पावसात विजा चमकताना सावधानता बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:31 AM2019-06-13T00:31:07+5:302019-06-13T00:31:33+5:30
पावसाळ्यात वीज कोसळून जीवित हानी घडण्याच्या घटना वाढतात. वीज कोसळू नये, यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सावधानता बाळगल्यास स्वत:वर वीज कोसळण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळ्यात वीज कोसळून जीवित हानी घडण्याच्या घटना वाढतात. वीज कोसळू नये, यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सावधानता बाळगल्यास स्वत:वर वीज कोसळण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात वीज कोसळण्याचे प्रमाण सुद्धा अधिक आहे. काही नागरिक वादळाची चिन्हे दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात व ऐनवेळी योग्य आसरा न मिळाल्याने जीवित हानी होते. विजा चमकत असताना शक्यतो लहान टेकडी, एकाकी झाड, झेंड्याचा खांब, प्रक्षेपण मनोरा यासारख्या उंच असलेल्या जागांचा आश्रय टाळावा. विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी कोणतीही जागा पूर्ण सुरक्षित नसते. तरीही बंदिस्त इमारत, चारचाकी वाहन, ट्रक, बस, कार ही साधने बरीच सुरक्षित मानली जातात व आसरा घेण्यास काहीच हरकत नाही. वादळादरम्यान जनावरे झाडाखाली एकत्र गोळा होतात आणि विजेच्या कोसळण्याने एकाचवेळी अनेक जनावरांना प्राण गमवावा लागतो. वीज नेहमी सर्वात उंच जागेवर कोसळते. धातूची वस्तू जेवढी मोठी तेवढी वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते. जेवढे झाड उंच तेवढा धोका अधिक असतो, त्यामुळे झाडापासून दूर राहावे.
दळात घ्यावयाची काळजीवा
छत्रा, कोयते, सुऱ्या, गोल्फ, खेळण्याची काठी अशा धातूंच्या वस्तू जवळ ठेवू नका. वीज चमकायला लागल्यास जमिनीवर बसा, दोन्ही पावले जमिनीवर ठेवा, पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडा आणि त्याभोवताल हातांचा विळखा घाला. हनुवटी गुडघ्यावर दाबून धरा. जंगलात असाल तर शक्य तो कमी उंचीच्या झुडूपांमध्ये लपण्याचा प्रयत्न करा, मोकळ्या जागेत असाल तर शक्यतो कडेकपारीमध्ये आसरा घ्या, पाण्यात असाल तर जमिनीवर यावे.
मेघ गर्जना सुरू असताना हे करा
मेघ गर्जना सुरू असताना घराबाहेर असाल तर त्वरित आसरा शोधा, इमारत हा सर्वात सुरक्षित आसरा आहे. पण इमारत नसेल तर गुहा, खड्डा किंवा खिंडीसारख्या भागात आश्रय घ्या. उंच झाडे स्वत:कडे विजेला आकर्षित करीत असल्याने झाडाखाली कधीच थांबू नका. आसरा मिळाला नाही तर परिसरातील सर्वात उंच जागा टाळा, जवळपास फक्त उंचच झाडे असतील तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर थांबा, जमिनीवर वाका आणि बसून राहा. वादळाची चाहूल लागली तर शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. विजा चमकणे सुरू असताना विजेच्या सुवाहकांपासून दूर राहा. जर तुम्हाला विद्युत भारीत वाटत असेल म्हणजेच तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर गुडघ्यात मान घालून बसा.
वीज पडली तर करावयाचा प्रथमोपचार
जर तुमच्या आसपास एखाद्या व्यक्तीवर वीज पडली असेल तर त्याच्यावर त्वरित प्रथमोपचार करा. श्वासोच्छवास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास नैसर्गिकरित्या सुरू होण्यास मदत होईल. हृदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा उपयोग करावा. नाडीचा ठोका चालू असेल तर अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा याबाबत तपासणी व नोंद करा. दृष्टी ठिक आहे किंवा नाही, ऐकू येते किंवा नाही तसेच इतर हालचालींची नोंद घ्या.
विजा चमकताना हे करू नका
विद्युत उपकरणे चालू करून वापरू नका. वादळात टेलिफोन, मोबाइलचा वापर टाळा, बाहेर असताना धातूंच्या वस्तूंचा वापर करू नका.