२१ लाखांची मदत के व्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:10 AM2017-09-06T00:10:28+5:302017-09-06T00:10:52+5:30
सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीने अनेक गोठे व घरांची पडझड झाली आहे. वीज पडून जनावरे दगावली. तर पुरामध्ये अडकून वीज पडून एकूण सहा इसमांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीने अनेक गोठे व घरांची पडझड झाली आहे. वीज पडून जनावरे दगावली. तर पुरामध्ये अडकून वीज पडून एकूण सहा इसमांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात तालुकास्तरावरून आपदग्रस्तांना मदतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्यापही २१ लाख २ हजार ३३५ रूपयांची मदत देणे शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
एप्रिल ते जुलैपर्यंत यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे सहा इसमांचा मृत्यू झाला. यामध्ये कोरची तालुक्यातील एक व मुलचेरा तालुक्यातील पाच इसमांचा समावेश आहे. सदर मृतक इसमांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांप्रमाणे २४ लाख रूपयांची मदत प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
वीज पडून झालेल्या आपत्तीमुळे १८ इसम जखमी झाले. या १८ इसमांना एकूण १ लाख २ हजार ६०० रूपयांची मदत देण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील एक, कोरची एक, देसाईगंज तीन, आरमोरी एक, चामोर्शी तीन, मुलचेरा सात, अहेरी तालुक्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. आपत्तीमुळे यंदा ३० लहान जनावरे दगावली. यामुळे १ लाख २३ हजार रूपयांचे संबंधित पशुपालकांचे नुकसान झाले. यापैकी प्रशासनामार्फत २४ जनावर मालकांना १ लाख ५ हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अद्यापही सहा जनावर मालक मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
आपत्तीमुळे ४५ मोठी जनावरे दगावली. यामुळे १० लाख १७ हजार रूपयांचे नुकसान झाले. यापैकी २४ जनावर मालकांना ५ लाख १४ हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अद्यापही २१ जनावरे मालक ५ लाख ३ हजार रूपये मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे जिल्हाभरात एकूण ५६९ घरांची अंशत: पडझड झाली. यामुळे १७ लाख ६९ हजार ५३२ रूपयांचे नुकसान झाले. यापैकी केवळ १०० आपदग्रस्तांना १ लाख ९२ हजार ४०० रूपयांची मदत देण्यात आली. अद्यापही ४६९ आपदग्रस्त १५ लाख ७७ हजार १३५ रूपयांच्या मदतीपासून वंचित आहेत.
पावसामुळे दोन घरांची पूर्णत: पडझड झाली. यापैकी एकाला १८ हजार ५०० रूपयांची मदत देण्यात आली.
पावसामुळे सात गोठ्यांची अंशत: पडझड झाली असून १२ हजार ४०० रूपयांचे नुकसान झाले. यापैकी पाच नुकसानग्रस्तांना ८ हजार २०० रूपयांची मदत देण्यात आली. अद्यापही दोन आपदग्रस्त ४ हजार २०० मदतीपासून प्रलंबित आहे. जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर निधी वळता करण्यात आला आहे. मात्र दिरंगाई तालुकास्तरावरून होत आहे.
अतिवृष्टीने ५४ लाख रूपयांचे नुकसान
यावर्षीच्या पावसाळ्यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला. १८ नागरिक जखमी झाले. ३० लहान जनावरे, ४५ मोठे जनावरे मृत्यमुखी पडली. ५६९ घरांचे अंशत: व दोन घरांचे पूर्णत: नुकसान झाले. सात गुरांचे गोठे कोसळले. या सर्व बाबीमुळे नागरिकांचे २४ लाख ४३ हजार ३५ हजार रूपयांचे नुकसान झाले. आपदग्रस्तांना आतापर्यंत ३३ लाख ४० हजार ७०० रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. तर २१ लाख २ हजार रूपयांची मदत अजूनही देण्यात आली नाही. यामध्ये जनावर मालक व घर कोसळलेल्या नागरिकांचा समावेश आहे. सदर मदत तत्काळ देण्याची मागणी आहे.