वैरागड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले
By Admin | Published: February 8, 2016 01:27 AM2016-02-08T01:27:18+5:302016-02-08T01:27:18+5:30
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पुरातत्व विभागाकडून लाखोंचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तीन महिले उलटले : पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष
वैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पुरातत्व विभागाकडून लाखोंचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षी किल्ल्याचा तळ, बुरूजावरची झाडे, झुडूपे तोडून थोडीफार डागडुजी करण्यात आली. यावर्षीही सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात झाली होती. पण डिसेंबर २०१५ पासून किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्णत: बंद पडले आहे.
चंद्रपूरचा राजा बल्लाळशहा यांनी हिऱ्याच्या खाणीच्या सुरक्षिततेसाठी वैरागड येथे किल्ला बांधला, असा इतिहास आहे. सदर किल्ला जुन्या कलाकुसरीची साक्ष देणारा आहे. मात्र किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी सरकारकडून फारसे प्रयत्न झाले नाही. मागील दोन वर्षांपासून पूरातत्व विभागाने किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले. सन २०१४-१५ या वर्षात येथे किरकोळ दुरूस्ती करण्यात आली. त्यानंतर सौंदर्यीकरणाचे काम थांबविण्यात आले. पुन्हा किल्ल्याचा तळ, बुरूजावर झाडाझुडूपांनी वेढा दिला. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही या किल्ल्याच्या किरकोळ दुरूस्तीचे काम करण्यात आले. त्यानंतर काम बंद पडले. आता तरी शासनाने या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम गतीने करावे. (वार्ताहर)