कुपोषण संपविण्यासाठी आरोग्यदूत बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 01:18 AM2016-09-10T01:18:55+5:302016-09-10T01:18:55+5:30
गडचिरोली जिल्ह्याला कुपोषणाने ग्रासले आहे. कुपोषणाला समूळ नष्ट करण्यासाठी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी
नगराध्यक्षांचे प्रतिपादन : अहेरीत पोेषण आहार सप्ताह साजरा
अहेरी : गडचिरोली जिल्ह्याला कुपोषणाने ग्रासले आहे. कुपोषणाला समूळ नष्ट करण्यासाठी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या स्थानिक क्षेत्रात आरोग्यदूत म्हणून काम करावे, कुपोषणासोबतच बालमृत्यू, मातामृत्यूवर आळा घालावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार यांनी केले.
अहेरी येथील श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयात आयोजित पोषण आहार सप्ताह कार्यक्रमात नगराध्यक्ष पेदापल्लीवार बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मोरेश्वर बोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून विवेक बेझलवार, गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मंगला बन्सोड, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश ढेंगळे उपस्थित होते.
अज्ञान व अंधश्रद्धेमुळे कुपोषणाच्या समस्येवर वर्चस्व मिळविता आले नाही. परंतु उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी आपल्या गावात जाऊन नागरिकांमध्ये पोषण आहाराविषयी जागरूकता निर्माण केल्यास कुपोषण संपुष्ठात येईल, असेही पेदापल्लीवार म्हणाल्या. कुपोषणावर मात करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेझलवार यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. मंगला बन्सोड, संचालन प्रा. प्रीती खोब्रागडे तर आभार प्रा. पद्मनाभम कवीराजवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)