अहेरीत विकास कामांना सुरुवात
By admin | Published: May 31, 2017 02:22 AM2017-05-31T02:22:23+5:302017-05-31T02:22:23+5:30
अहेरी शहरात विविध प्रकारचे विकासकामे करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून तीन कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
तीन कोटीतून होणार कामे : सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी शहरात विविध प्रकारचे विकासकामे करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून तीन कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून अहेरी शहरात विविध प्रकारची विकासकामे सुरू झाली आहेत. या विकासकामांमुळे अहेरी शहराचे रूप पालटण्यास मदत होणार आहे.
पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. अहेरी शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमॉस्ट लाईट लावण्यात आले. त्याच्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसविण्यात आले आहेत. सदर कॅमेरे काही तांत्रिक कारणामुळे बंद आहेत. मात्र लवकरच सदर कॅमेरेसुद्धा सुरू होतील, अशी अपेक्षा नगराध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
शहरात विविध ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे काम केले जात आहे. या कामांच्या दर्जावर पालकमंत्री, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. शहरात स्वच्छता राहावी यासाठी विशेष उपाययोजना केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी अहेरी शहरातील नाल्यांचा उपसा करण्यासाठी नगर पंचायतीने नियोजन केले आहे. त्याचबरोबर कचराकुंडीमध्ये कचरा जास्त दिवस पडून राहणार नाही, याचेही निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच निधी उपलब्ध झाला नव्हता.
प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. सदर पूल झाल्यानंतर तेलंगणा व अहेरीतील दळणवळण वाढणार आहे. याचा फायदा अहेरी शहरातील नागरिकांना होणार आहे.
अग्निशमन वाहन येणार
अहेरी नगर पंचायतीला १५ दिवसांत अग्निशमन वाहन उपलब्ध होणार आहे. याचा लाभ अहेरी उपविभागातील शहरे व गावांना होणार आहे. अहेरी नगर पंचायतीला अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी सातत्याने पाठपुरावा केला होता.