आपत्ती व्यवस्थापन अभियानाला सुरुवात
By admin | Published: August 7, 2015 01:19 AM2015-08-07T01:19:03+5:302015-08-07T01:19:03+5:30
पुरात अडकलेली व्यक्ती जीव वाचावा म्हणून प्रयत्न करीत आहे. त्यातच एक मोटरबोट नदीच्या मध्यापर्यंत पोहोचते ...
१५ आॅगस्टपर्यंत चालणार कार्यक्रम : मार्र्कं डादेव येथे पार पडले प्रात्यक्षिक
मार्र्कं डादेव : पुरात अडकलेली व्यक्ती जीव वाचावा म्हणून प्रयत्न करीत आहे. त्यातच एक मोटरबोट नदीच्या मध्यापर्यंत पोहोचते आणि लाईफ जॅकेटसह पाण्यात उतरुन दोन जण त्याला सुखरुपपणे त्या बोटीवर बसवताहेत, अर्थात हे दृश्य सरावाचे. आपत्ती व्यवस्थापन हा आयुष्यात महत्त्वाचा विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा देवस्थानाच्या घाटावर गुरूवारी शेकडो गावकरी हे दृश्य श्वास रोखून बघत होते.
बुडणारी व्यक्ती आणि त्याला वाचविणारे हे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पुणे येथील जवान होते. पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन दलाने गडचिरोली जिल्ह्यात १ आॅगस्टपासून प्रशिक्षणासाठी हे विशेष अभियान सुरु केले आहे. जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्या मार्गदर्शनात हे अभियान सुरु असून १५ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी आपत्ती येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षक अनुभूतीचा फरक लोकांना कळावा यासाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पुरातील व्यक्तीचा जीव वाचवितांना स्वत: कसे सुरक्षित राहायचे याचेही प्रात्यक्षिक याप्रसंगी करण्यात आले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुनंदा पडोळे, उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपाडे, तहसीलदार उमाकांत वैद्य, नायब तहसीलदार दहिकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. (वार्ताहर)
आपत्ती व्यवस्थापनासाठी ३० जणांची चमू
एनडीआरएफ पुणे येथील आनंद बघेल, डॉ. प्रीती कौर, डॉ. किरणजीत कौर आणि इतर ३० जणांची चमू जिल्ह्यामध्ये या प्रकारची प्रात्यक्षिके करीत आहे. घरगुती साधनांचा वापर करुन पुरात बुडाल्यानंतर कसा जीव वाचवावा त्याचे धडे उपस्थितांनी गिरवले. प्लास्टिकच्या रिकाम्या घागरी, पाणी वापरानंतर निकामी झालेल्या बाटल्या तसेच व्हॉलिबॉल, फुटबॉल या खेळातील चेंडू आणि सहज उपलब्ध होणारा बांबू आणि दोरी आदींच्या सहाय्याने पुरातील व्यक्तीला कसे वाचवावे आदींची माहिती यावेळी देण्यात आली.