खरीप हंगामाच्या बाह्य मशागतीला सुरूवात
By admin | Published: June 5, 2017 12:38 AM2017-06-05T00:38:12+5:302017-06-05T00:38:12+5:30
यंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊस पडणार अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही चांगल्या पावसाची आशा आहे.
चांगल्या पर्जन्याची शेतकऱ्यांना आशा : ग्रामीण भागात पाळीवर माती टाकण्याच्या कामास प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : यंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊस पडणार अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही चांगल्या पावसाची आशा आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात चार दिवसापूर्वी झालेल्या हलक्याशा सरीनंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या बाह्य मशागतीच्या कामास प्रारंभ केला आहे. वैरागड भागासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक शेतकरी व मजूर बाह्य मशागतीचे कामे करीत असल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामातील पिकांचा पेरा वाढणार असून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शाश्वत शेती तसेच विविध योजना व उपक्रम कार्यान्वित करण्यात आले आहे. याशिवाय कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पीक लागवडीबाबत मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पीक लागवडीची नवी पध्दत गतवर्षीपासून अमलात आणली आहे. यंदा तूळ, मूग, उडीद आणि रबी हंगामातील पिकातही वाढ होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील तूर पिकामध्ये ग्रामीण भागात वाढ झाली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या धानपट्ट्यातील जिल्ह्यामध्ये शेताच्या पाळीवर तूर पीक घेण्याची पध्दत आहे. सदर तूर पिकासाठी सध्या पाळीवर माती टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काही शेतकरी शेतातील कचरा जाळणे, धसकट उपटणे व पाळीवरील कचरा जाळण्याचे काम करीत आहे. शेत शिवार परिसरात लगबग वाढली आहे.
अनेक शेतकरी स्वत:कडील बियाणे वापरणार
जिल्हाभरातील कृषी केंद्रात धान, तूर, मूग, उडीद व इतर पिकांच्या विविध वाणांचे बियाणे कृषी केंद्रात उपलब्ध झाले आहेत. मात्र बहुतांश कंपन्यांचे बियाणे महागडी असल्याने अनेक शेतकरी आपल्या घरीच बीज प्रक्रिया करून स्वत:कडील बियाणे पेरणार आहेत. त्या दृष्टीने अनेक शेतकऱ्यांनी तयारी चालविली आहे.