वडसा रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाला सुरुवात
By Admin | Published: December 4, 2015 01:44 AM2015-12-04T01:44:00+5:302015-12-04T01:44:00+5:30
जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक असलेल्या वडसा रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाला २ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे.
कामाचा शुभारंभ : रेल्वे सल्लागार समितीचे पदाधिकारी उपस्थित
देसाईगंज : जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक असलेल्या वडसा रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाला २ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या अडचणी आता कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वडसा रेल्वे स्थानक हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते. यातून रेल्वेला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असले तरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा नसल्याने रेल्वे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रेल्वे स्थानकाची दुरूस्ती करण्यात यावी व प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्या, यासाठी सातत्याने मागणी केली जात होती.
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकाच्या दुरूस्तीला हिरवी झेंडी दर्शविली. कामाचे टेंडर काढण्यात येऊन २ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. दक्षिण पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक सचिन शर्मा, रेल्वेचे अभियंता व कंत्राटदार यांनी प्रत्यक्ष रेल्वेस्थानकाला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक तन्मय मुखोपाध्याय, निर्माण उपमुख्य अभियंता पात्रो, उपमुख्य विद्युतीकरण अभियंता जी. रमेश, उपमुख्य विद्युत अभियंता शालिकराम, सहाय्यक विद्युत अभियंता सुनील कुमार, सहाय्यक अभियंता एन. पांडेय, कंत्राटदार दीपक लोहिया, रेल्वे सल्लागार सदस्य डॉ. विष्णू वैरागडे, ऋषी शेबे, बाळा सगदेवे, चक्रधर टिकले, प्रबंध व्यवस्थापक टी. एस. भोंडे, संजय कुमार, रितेश कुमार आदी उपस्थित होते.
वडसा शहराचे दोन भागात विभाजन करणाऱ्या रेल्वे मार्गामुळे शहरात रेल्वे फाटकाजवळ वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी भूमीगत पूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले. त्या कामालाही आता वेग आला आहे. आगामी वर्षात हा भूमीगत पूल पूर्ण होईल, अशी आशा आहे. (वार्ताहर)
रेल्वे स्थानकात होणाऱ्या सुविधा
वडसा रेल्वे स्थानकावर पॅसेंजर्ससाठी दुसऱ्या फलाटाची निर्मिती केली जाणार आहे. फलाटाची उंची वाढविणे, मालगाडीसाठी स्वतंत्र सर्वसोयीयुक्त फलाट उभारणे, गुड्स सेट उभारणे, पादचारी उडाण पुलाचे विस्तारीकरण करणे, दुसऱ्या क्रमांकाच्या फलाटावर अतिरिक्त बुकिंग आॅफिस, पाणी, शौचालय आदी सुविधा निर्मिती करणे, दोन रेल्वे रूळांचे विस्तारिकरण करणे, रेल्वे स्टेशन मास्तर कार्यालयात सोयीसुविधा उपलब्ध करणे यांचा समावेश आहे.