भोजनावरील बहिष्कार मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:55 PM2017-09-05T23:55:13+5:302017-09-05T23:55:31+5:30
निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचा आरोप करून भामरागड येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भोजनावर मागील तीन दिवसांपासून बहिष्कार टाकला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचा आरोप करून भामरागड येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भोजनावर मागील तीन दिवसांपासून बहिष्कार टाकला होता. प्रकल्प अधिकाºयांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा तांदूळ उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून जेवणावरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले आहे.
भामरागड येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह आहेत. या वसतिगृहात आठवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे ३७ विद्यार्थी आहेत. या वसतिगृहाला भोजन पुरवठा करण्यासाठी लॉर्ड बिरसा मुंडा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला कंत्राट देण्यात आला आहे. शासन प्रतिविद्यार्थी प्रतिमहा २ हजार ९९० रूपयांचे अनुदान संस्थेला देते. तरीही संस्था विद्यार्थ्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण देत आहे. तांदळाचा दर्जा अतिशय खराब आहे, असा आरोप करून जेवणावर बहिष्कार टाकला होता. मात्र मंगळवारपासून बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.
वसतिगृह इमारतीतही अनेक समस्या
वसतिगृहातील शौचालय चोकअप झाले आहेत. नगर पंचायततर्फे वसतिगृहासमोर हातपंप बसविण्यात आला आहे. मात्र सदर हातपंपाचे पाणी अशुद्ध आहे. इमारतीच्या खिडक्या, दरवाजे तुटले आहेत. संरक्षण भिंत नसल्यामुळे गावातील पाळीव जावरे, कुत्रे, डुकरे वसतिगृहाच्या परिसरात फिरत राहतात. खोल्यांमधील स्विच बोर्ड तुटले आहेत. पंखे व्यवस्थित नाही, अशीही तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
वसतिगृहाला भेट घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. कंत्राटदार व विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यात आला आहे. कंत्राटदार विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार बारीक व चांगल्या दर्जाच्या तांदळाचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बहिष्कार मागे घेतला आहे.
- नीरज मोरे, प्रकल्प अधिकारी, भामरागड
टेंडरमध्ये बारीकच तांदूळ पुरवावा, असे सक्तीचे नाही. मागील चार-पाच वर्षांपासून जे तांदूळ पुरविले जात होते त्याच दर्जाचे तांदूळ याही वर्षी उपलब्ध होते. मात्र विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याने आता त्यांना त्यांच्या मर्जीनुसार बारीक तांदूळ उपलब्ध करून देण्यात येईल. टेंडरमध्ये ठरवून दिलेल्या मेन्यूनुसारच विद्यार्थ्यांना नाश्ता व जेवण दिले जाते.
- कबीर शेख, भोजन कंत्राटदार, भामरागड