धान उत्पादन वाढीसाठी एक पट्टा पद्धत उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:23 AM2021-07-03T04:23:12+5:302021-07-03T04:23:12+5:30
वडसा तालुक्यातील जुनी वडसा, नैनपूर, तुळशी, कुरुड, कोंढाळा, कोकडी, विसोरा, कोरेगाव बोळधा, चोप, विर्शीतुकुम या गावांसह तालुक्यातील शेतकरी धान ...
वडसा तालुक्यातील जुनी वडसा, नैनपूर, तुळशी, कुरुड, कोंढाळा, कोकडी, विसोरा, कोरेगाव बोळधा, चोप, विर्शीतुकुम या गावांसह तालुक्यातील शेतकरी धान पीक लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. मागील २-३ वर्षांपासून वातावरणात झालेल्या बदलांमुळे भात पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने, उत्पादन खर्चात वाढ होऊन शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. याकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने भात लागवडीची एक पट्टा पद्धत खूप किफायतशीर पद्धत प्रचलित झालेली आहे.
२८ जून रोजी नैनपूर येथील गजानन नखाते, वडसा जुनी येथील अनिल सहारे, देवेंद्र राऊत, रामकृष्ण पत्रे, ईश्वर सहारे, ताराचंद पत्रे यांच्या शेतावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन दाखवित पट्टा पद्धतीने भात पिकाची लागवड कशी केली जाते व फायदे काय आहेत, तूर लागवड करताना नागमोडी पद्धतीने कशी करावी, याविषयी सविस्तर माहिती शेतीशाळा घेऊन कृषी पर्यवेक्षक युगेश रणदिवे, कृषी सहायक कल्पना ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
काय आहे पट्टा पद्धत ?
पट्टा पद्धतीत लवकर येणारे भात पिकाचे वाण २०:२० अंतरावर तसेच मध्यम व उशिरा येणारे धान पिकाचे वाण २५:२५ अंतरावर प्रती दोन ते तीन रोपे घेऊन उथळ व सरळ रोवणी करावी लागते. ८ ते १० ओळी सलग रोवणी झाल्यानंतर ३० ते ४० सेमी अंतर सोडून पुन्हा रोवणी करावी लागते. लागवड शक्यतो पूर्व -पश्चिम दिशेने करावी. त्यामुळे दोन ओळीत हवा खेळती राहते. फवारणी करताना चालण्यासाठी आपण या ओळींचा वापर करु शकतो.३०-४०सेंमी जागा सोडल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो. तुडतुड्याच्या वाढीस व प्रसारास नैसर्गिक अडथळा निर्माण होतो. मोकळ्या पट्ट्यातून पिकाचे निरीक्षण करणे व फवारणी करणे, खते देणे, पिकातील भेसळ काढणे सोयीचे होते. फुटव्यांची संख्या वाढते, रोपांची संख्या कमी लागत असल्याने बियाणांची बचत होते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढते.
020721\img-20210701-wa0069.jpg
भाताच्या उत्पादन वाढीसाठी व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एक पट्टा पध्दत उपयुक्त : तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम