घरकूल लाभार्थी अनुदानापासून वंचित

By admin | Published: June 2, 2016 02:57 AM2016-06-02T02:57:19+5:302016-06-02T02:57:19+5:30

इंदिरा आवास योजना सन २०१५-१६ योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही पहिला

Benefactor Beneficiary is deprived of subsidy | घरकूल लाभार्थी अनुदानापासून वंचित

घरकूल लाभार्थी अनुदानापासून वंचित

Next

पंचायत समितीवर लाभार्थ्यांची धडक : अनुदान बँक खात्यात जमा करा
अहेरी : इंदिरा आवास योजना सन २०१५-१६ योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही पहिला हप्त्याच्या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी कैलाश कोरेत यांच्या नेतृत्वात अहेरी पंचायत समितीवर मंगळवारी धडक दिली.
यावेळी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पात्र घरकूल लाभार्थ्यांचे अनुदान त्वरित खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, इंदिरा आवास योजना सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पंचायत समिती अहेरी अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीने पाठविलेल्या प्रतीक्षा निवड यादीनुसार पात्र करण्यात आले होते. पं. स. प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतींना सदर पात्र लाभार्थ्यांचे कागदपत्र ३१ मार्च २०१६ पूर्वी सादर करण्याचे पत्र पाठविण्यात आले असता, लाभार्थ्यांनी कागदपत्रे पंचायत समितीकडे सादर केली.
दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यांक प्रवर्गातील तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे पात्र यादीतील पत्रानुसार कर्जबाजारी होऊन बांधकाम साहित्य खरेदी करून घरकुलाच्या कामाची सुरुवात केली. मागील दोन महिन्यांपासून अनुदानाचा पहिला हप्ता मिळालेला नाही. परंतु पावसाळा जवळ आल्याने लाभार्थ्यांवर फार मोठे संकट उभे ठाकले आहे. पावसाळ्यापूर्वी घराचे बांधकाम पूर्ण न झाल्यास लाभार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न उद्भवणार आहे. मागील तीन वर्षांपासून उपविभागात दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. अशाही परिस्थितीत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लाभार्थ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील पात्र लाभार्थ्यांचे अनुदान तत्काळ खात्यात जमा करून न्याय मिळवून देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कैलाश कोरेत व पात्र लाभार्थ्यांनी दिला आहे.
यावेळी संवर्ग विकास अधिकारी चांदेकर यांनी पंचायत समिती प्रशासनाकडून अनुदान मागणीचे पत्र पाठविल्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Benefactor Beneficiary is deprived of subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.