मृतकाच्या वारसदारांना मिळाले दोन लाख रूपये
By admin | Published: August 13, 2015 12:28 AM2015-08-13T00:28:04+5:302015-08-13T00:28:04+5:30
प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चामोर्शी येथील खातेदार शालिनी गजानन दुधबावरे यांनी केवळ १२ भरून स्वत:चा विमा काढला होता.
चामोर्शी : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चामोर्शी येथील खातेदार शालिनी गजानन दुधबावरे यांनी केवळ १२ भरून स्वत:चा विमा काढला होता. दुर्दैवाने शालिनी दुधबावरे हिचा स्वयंपाक करताना जळाल्याने मृत्यू झाला. ग्रामीण बँकेने विमा कंपनीकडे संबंधित खातेदाराच्या वारसदारांना विम्याच्या रकमेचा लाभ देण्यात यावा, असा दावा सादर केला. विमा कंपनीने सदर दावा मंजूर केल्यानंतर मृतकाचे वारसदार गजानन उष्टू दुधबावरे याला दोन लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
भाजप प्रणीत केंद्र सरकारद्वारे घोषित सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जीवन सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेद्वारे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेची माहिती मिळाल्यानंतर चामोर्शी येथील शालिनी गजानन दुधबावरे यांनी जीवन सुरक्षा विमा योजनेचे खाते उघडले.
खातेदार शालिनी गजानन दुधबावरे ही घरी स्वयंपाक करताना जळून तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चामोर्शीचे शाखाधिकारी हबीब सय्यद यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गजानन दुधबावरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वन केले. तसेच प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. त्यानुसार दुधबावरे कुटुंबीयांनी सर्व आवश्यक कागदपत्रे ४ जुलै २०१५ रोजी शाखा व्यवस्थापकाकडे सादर केले. सदर कागदपत्र जोडून शाखा व्यवस्थापक दि न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीकडे दावा सादर केला. कंपनीने दावा मंजूर केल्यानंतर विम्याचे दोन लाख रूपये ग्रामीण बँकेकडे जमा झाले. त्यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक हबीब सय्यद यांनी ७ जुलै रोजी शुक्रवारला कुरूड येथील बँकेच्या अति लघु शाखेत मृतकाचे वारसदार गजानन दुधबावरे यांना प्रदान केला.
यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी एस. जी. खत्री, दिलीप काशिनाथ चलाख, कुरूडचे उपसरपंच रमेश सातपुते, ग्रा. पं. सदस्य बाबुराव शेंडे, ग्रामसेवक प्रधान आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेद्वारे भारत सरकारच्या विमा योजनेची माहिती गावागावात जाऊन दिली जात आहे. सदर घटनेमुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची सामाजिक बांधिलकी जनतेसमोर आली आहे. याअनुभवातून योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले भविष्य सुरक्षित करावे, तसेच आयुष्य सुरक्षित करणाऱ्या व म्हातारपणाची सोय म्हणून नागरिकांनी अटल पेंशन योजनेचाही लाभ घ्यावा. यासाठी ग्रामीण बँकेच्या कोणत्याही शाखेशी नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्रीधर नार्लावार यांनी यावेळी केले. (शहर प्रतिनिधी)
विरोधी पक्षांच्या नेत्यांना बसली चपराक
केंद्रात भाजप-शिवसेना युतीची सरकार स्थापन झाल्यानंतर प्रधानमंत्री पदाची सूत्रे नरेंद्र मोदी यांनी स्वीकारली. त्यांनी अनेक नाविण्यपूर्ण कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान विरोधी पक्षातील नेते पंतप्रधानांच्या साऱ्याच योजना सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आहेत, अशी टीका केली होती. मात्र प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत खातेदाराच्या वारसदारास लाभ मिळाल्यामुळे टीका करणाऱ्या या नेत्यांना चांगलीच चपराक बसली आहे.