नगर परिषद कर्मचाऱ्यांचे हक्कासाठी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:16 AM2018-12-16T01:16:01+5:302018-12-16T01:17:51+5:30
नगर परिषद, नगर पंचायतमध्ये कार्यरत रोजंदारी, स्थायी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी नगर परिषदेत शनिवारी धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर परिषद, नगर पंचायतमध्ये कार्यरत रोजंदारी, स्थायी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी नगर परिषदेत शनिवारी धरणे आंदोलन केले.
सातवा वेतन आयोग लागू करावा, वर्ग ४ च्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दहावी, बारावीच्या शैक्षणिक अर्हतेवर पदोन्नती द्यावी, रजा रोखीकरण द्यावे, २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, १९९३ पूर्वी स्थायी करण्यात आलेल्या रोजंदारी कामगारांना वारसा हक्क लागू करावा, त्यांना स्थायी करावे, नगर पंचायतीत रोजंदारी कामगारांचे समायोजन करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेंतर्गत सफाई कामगारांना आवास योजनेसाठी २५ वर्षांची अट शिथील करावी, ठेका पध्दती बंद करावी, आदी मागण्यांसाठी राज्यभरात १५ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी तालुक्यातीलही सफाई कामगारांनी सहभाग घेतला.
गडचिरोली नगर परिषदेत ज्ञानेश्वर सोरते, रितेश सोनवाने, गणेश ठाकरे, सुधाकर भरडकर, रोजंदारी कर्मचारी भिमराव जनबंधू, अशोक गेडाम, लक्ष्मी सिलेदार, गीता सिलेदार, राकेश सिलेदार आदींनी सहभाग घेतला. आरमोरी नगर परिषदेत अभियंता अविनाश बंडावार, लिपीक गिरीश बांते, अभियंता नितीन गोरखंड, बारापिंपळे, सुनिता शेंद्रे, हरीश शेंद्रे, सुधीर सेलोकर, भास्कर टिचकुले, पवन मोगरे यांनी सहभाग घेतला. देसाईगंज नगर परिषदेत कनिष्ठ लिपीक पेंदाम, अमित पठाण, मंगेश बोहरे, विनोद म्हरस्कोल्हे, मुकेश सोनेकर, नमिता मोगरे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगण महातो, सहसचिव सुभाष महानंदे, शहर अध्यक्ष प्रितम राणे, उपाध्यक्ष योगेश सोनवाने, ईश्वर महातो यांनी केले.
कामबंद आंदोलनाचा इशारा
नगर परिषद व नगर पंचायतीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्या, यासाठी कर्मचारी संघटनांच्या वतीने यापूर्वी अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे टप्प्या टप्प्याने आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १५ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन केले जाणार आहे. २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून आंदोलन केले जाईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास १ जानेवारी पासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगण महातो यांनी दिला आहे.