७१ हजार शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:06 AM2019-05-08T00:06:12+5:302019-05-08T00:07:46+5:30
जमिनीतील घटकद्रव्यानुसार पिकांची निवड व खतांची मात्रा ठरवावी लागते. जमिनीत कोणते घटकद्रव्य आहेत, याची माहिती मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणीच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यामुळे शासनाने शेतकºयांच्या शेतजमिनीची चाचणी करून त्यामध्ये कोणते घटकद्रव्य आहेत, याबाबतचा उल्लेख असलेली आरोग्य पत्रिका वितरित करण्याची योजना आखली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जमिनीतील घटकद्रव्यानुसार पिकांची निवड व खतांची मात्रा ठरवावी लागते. जमिनीत कोणते घटकद्रव्य आहेत, याची माहिती मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणीच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची चाचणी करून त्यामध्ये कोणते घटकद्रव्य आहेत, याबाबतचा उल्लेख असलेली आरोग्य पत्रिका वितरित करण्याची योजना आखली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ७१ हजार ८२५ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे.
जमिनीमध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद, पालाश, लोह, जस्त आदी मूलद्रव्य आढळून येतात. प्रत्येक जमिनीमध्ये याचे प्रमाण कमीजास्त राहते. त्यावरून मातीचा प्रकार ठरविल्या जातो. तसेच या मातीवरून पिकांची निवड केली जाते. मातीची चाचणी करण्याची माहिती शेतकऱ्यांना राहत नाही. त्यामुळे शेतकरी मातीची चाचणी करून घेत नाही. परिसरातील शेतकरी ज्या पिकांची लागवड करतात, तेच पीक घेतात. मात्र काही किलोमीटर अंतरावर मातीचा दर्जा बदलतो. त्यानुसार पिकामध्ये बदल करणे आवश्यक आहे.
पिकांच्या वाढीच्या दृष्टीने नत्र, स्फुरद, पालाश, लोक, जस्त ही घटकद्रव्ये महत्त्वाची आहेत. मृदा सर्वेक्षण व चाचणी करतेवेळी याच घटकांचे प्रमाण तपासले जाते. २०१८-१९ या वर्षात २१ हजार ४ सर्वसाधारण मृदा नमूने व २१ हजार ४ सूक्ष्म नमूने असे एकूण ४२ हजार ८ नमूने तपासण्यात आले. त्या आधारे परिसरातील ७१ हजार ८२५ शेतकºयांना जमिनीच्या आरोग्यपत्रिकांचे वितरण करण्यात आले. जवळपास २० ते २५ हेक्टरसाठी एक नमुना घेतला जातो. तेवढ्या परिसरात जेवढ्या शेतकºयांच्या शेतजमिनी येतात, त्या शेतकºयांना आरोग्य पत्रिकेचे वितरण केले जाते. या आरोग्य पत्रिकेवर संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये नेमके कोणते घटकद्रव्य आहेत, याची माहिती होण्यास मदत होते.
आरोग्यपत्रिकेवर राहतो सल्ला
मृदेचे सर्वेक्षण व चाचणी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत नेमके कोणते घटकद्रव्य आहेत, याची माहिती दिली जाते. तसेच या घटकद्रव्यानुसार कोणत्या बिटांची लागवड करावी, शेतजमिनीत कोणत्या घटकद्रव्याचे प्रमाण अधिक आहे. कोणती घटकद्रव्य रासायनिक खतांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात देणे आवश्यक आहे, याची माहिती आरोग्य पत्रिकेवर दिली राहते. त्यामुळे सदर आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक पत्रिका म्हणून काम करते. शासनाला आरोग्य पत्रिकेचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला असल्याने संपूर्ण राज्यात ही योजना राबविली जात आहे.
आरोग्य पत्रिकेनुसार पिकांची निवडच नाही
जमिनीत असलेल्या घटकद्रव्यानुसार पिकांची निवड व खतांच्या मात्रा देणे आवश्यक आहे. यासाठीच आरोग्य पत्रिका दिली जाते. शासन मृदा सर्वेक्षण व चाचणीसाठी या मृदा सर्वेक्षण विभागाला निधी उपलब्ध करून देते. त्यामुळे कृषी विभागाच्या मदतीने मृदेचे सर्वेक्षण व चाचणी करून संबंधित शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिकांचे वितरण केले जाते. मात्र कोणत्या पिकासाठी जमीन योग्य आहे, याबाबत कृषी सहायक कोणतेही मार्गदर्शन करीत नाही. त्यामुळे आरोग्य पत्रिका हे एक केवळ कागद म्हणून शेतकऱ्याकडे शिल्लक राहते.