गरजूंना शिबिरातून मिळाला दाखल्यांचा लाभ
By admin | Published: May 21, 2016 01:22 AM2016-05-21T01:22:08+5:302016-05-21T01:22:08+5:30
महाराजस्व अभियानांतर्गत अहेरी तालुक्यातील राजाराम व देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा येथे महसूल विभागाच्या वतीने शिबिर...
महाराजस्व अभियान : राजाराम येथे दिली योजनांची माहिती व मजुरांशी साधला संवाद तर किन्हाळा येथे महिलांना साहित्य वाटप
अहेरी/ देसाईगंज : महाराजस्व अभियानांतर्गत अहेरी तालुक्यातील राजाराम व देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा येथे महसूल विभागाच्या वतीने शिबिर आयोजित करून गरजूंना दाखले वाटप करण्यात आले.
राजाराम खांदला येथे ग्राम पंचायत कार्यालयात समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, गुरनुले, सरपंच जुमनाके, ग्रामसेविका गावंडे, सडमेक, नागमोती, शेंडे, कुळमेथे, कत्रोजवार, श्रीरामे उपस्थित होते. शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे. या शिबिरात सांगितल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. शासनाच्या मागेल त्याला शेततळे, बोडी, मजगी आदी कामांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत्यनारायण सिलमवार यांनी केले. एक दिवस मजुरांसमवेत अंतर्गत १४८ मजुरांशी सिलमवार यांनी संवाद साधला. व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिधापत्रिकेला आधारकार्ड क्रमांक जोडावे, तेव्हाच आपल्याला लाभ मिळेल, असेही सांगितले. शिबिरात ११० उत्पन्न दाखले, ११ सातबारा, १५ शिधापत्रिका, ६ आधारकार्ड वितरित करून श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले.
देसाईगंज तालुक्यातील महाराजस्व अभियानांतर्गत शिबिर आयोजित करण्यात आले. महसूल विभागाच्या वतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. यावेळी पं. स. सभापती प्रीती शंभरकर, जि. प. सदस्य रेखा मडावी, शिवाजी राऊत, पं. स. सदस्य परसराम टिकले, तहसीलदार अजय चरडे, विद्युत अभियंता बोबडे, सहायक गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, कृषी अधिकारी गोथे उपस्थित होते. महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालयाच्या वतीने विविध दाखले तसेच गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला किन्हाळा, मोहटोला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)