३०० जोडप्यांना ‘शुभमंगल’चा लाभ
By admin | Published: August 8, 2015 01:28 AM2015-08-08T01:28:37+5:302015-08-08T01:28:37+5:30
जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह ...
दोन वर्षांत : ३६ लाख वितरित; २०१४-१५ मध्ये १०० जोडप्यांचे प्रस्ताव सादर
गडचिरोली : जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या ३०० लाभार्थ्यांना १२ हजार रूपये प्रमाणे एकूण ३६ लाखांचे अनुदान दोन वर्षांच्या कालावधीत वितरित करण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
नागरिकांना आपल्या मुला, मुलींचे लग्न करताना कर्जाचा डोंगर माथ्यावर करून विवाह सोहळा पार पाडावा लागतो. यातून अनेक मुलींचे वडील कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात. सर्वसामान्य पालकांनी लग्नसोहळ्याच्या कर्जामुळे आत्महत्या करू नये, नागरिकांच्या पैशाची बचत व्हावी, या हेतूने शासनाने शुभमंगल योजना कार्यान्वित केली आहे. सन २०१३-१४ या वर्षात विविध संस्थांमार्फत आयोजन करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या २०० जोडप्यांचे प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. तसेच २०१४-१५ या वर्षात सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या १०० जोडप्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव मंजूर केले. त्यानंतर शासनाकडून मागणीनुसार मिळालेल्या निधीतून दोन्ही वर्षातील जोडप्यांना एकूण ३६ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
शुभमंगल योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या प्रस्तावासोबत वर-वधूचा जातीचा दाखला, जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, वर-वधूने सक्षम प्राधिकरणासमोर केलेले प्रतिज्ञापत्र, वधूचे आईवडील शेतकरी, शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, वधूच्या पालकांचे एक लाखांच्या आत उत्पन्न असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र, विवाह नोंदणीचा दाखला, विवाह प्रथम असल्याचे तलाठी अथवा ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, वधूच्या आईच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, वधूची आई नसल्यास वडीलांचे बँक खाते, ते ही नसल्यास वधूच्या बँक खात्याची झेरॉक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.