सव्वा लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा लाभ

By admin | Published: March 24, 2017 01:03 AM2017-03-24T01:03:32+5:302017-03-24T01:03:32+5:30

२०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वी प्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.

The benefits of textbooks to 12 lakh students | सव्वा लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा लाभ

सव्वा लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा लाभ

Next

शिक्षण विभागाची तयारी : सर्व शिक्षा अभियानचा उपक्रम
गडचिरोली : २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वी प्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाभरात दोन हजार शाळा आहेत. या शाळेतील १ लाख २० हजार ४२४ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत १ ते ८ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. एक महिन्यापूर्वी पाठ्यपुस्तकांचे वितरण न करता पाठ्यपुस्तकांची रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्याचे निर्देश शिक्षकांना देण्यात आले होते. मात्र दोन महिन्याच्या कालावधीत सर्वच विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे शक्य होणार नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट लाभ योजनेतून पाठ्यपुस्तक योजनेला वगळले व पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचा निर्णय १५ दिवसांपूर्वी घेतला.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावेत, यासाठी शिक्षण विभागाच्या मार्फतीने नियोजन केले जात आहे. पाठ्यपुस्तक हे वितरण संबंधिच्या सर्व स्पष्ट सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुख्याध्यापकांकडून लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आली असून ती यादी शासनाकडे सादर करण्यात आली आहे. त्यानुसार २०१६-१७ या वर्षात मराठी माध्यमाच्या १ लाख १४ हजार ११५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. इंग्रजी माध्यमांच्या गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ आश्रमशाळा आहेत. यामध्ये एकूण ४५६ विद्यार्थी आहेत. हिंदी माध्यमांच्या १४ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण २ हजार ६५८ विद्यार्थी आहेत. उर्दू माध्यमाच्या पाच शाळा आहेत. यामध्ये एकूण २५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत.

पुढील वर्षीपासून खात्यात जमा होईल रक्कम
थेट लाभ योजनेंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण न करता तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र याला शिक्षण विभागातूनच प्रचंड विरोध होऊ लागला. विद्यार्थ्यांचे बँक खाते निघाले नाही तर तो विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल. त्यामुळे विद्यार्थ्याला पुस्तकांविनाच शाळेमध्ये यावे लागेल. त्याचबरोबर एखाद्या पालकाने पाठ्यपुस्तकांचे पैसे बँकेतून काढून इतर कामांवर खर्च केल्यास पैसे मिळूनही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहण्याचा धोका होता. मे महिन्यापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे व त्याची माहिती शिक्षण विभागाला देणे अशक्य असल्यानेही थेट लाभ योजनेतून पाठ्यपुस्तके वगळण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: The benefits of textbooks to 12 lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.