सर्वोत्कृष्ट आशांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:25 AM2019-03-09T01:25:46+5:302019-03-09T01:28:12+5:30
समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून समाज परिवर्तनाचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा सन्मान शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून समाज परिवर्तनाचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा सन्मान शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात करण्यात आला.
जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.भाऊराव वानखेडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक, जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमरदीप नंदेश्वर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अनुपम महेशगौरी, एल.आर.पोगरे उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूड येथील संजीवनी रेवनदास आठवले, द्वितीय पुरस्कार चामोर्शी तालुक्यातील आमगावच्या संगीता देवानंद कोहळे यांना देण्यात आला. विजेत्यांना अनुक्रमे आठ हजार व सहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर प्रत्येक तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशांना तालुकानिहाय प्रथम पुरस्कार ४ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार २ हजार ५०० रुपये प्रदान करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर प्रथम पुरस्कार एक हजार रुपये प्रमाणे ४७ पुरस्कार देण्यात आले. गटप्रवर्तकांना जिल्हास्तरीय तीन पुरस्कार देण्यात आले. यात प्रथम पुरस्कार १० हजार, द्वितीय पुरस्कार सहा हजार, तृतीय पुरस्कार चार हजार रुपये व प्रमाणपत्र असे स्वरूप होते. सदर पुरस्कार जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर व अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
माता व बाल मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने आशांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करावी, असे आवाहन जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली जोगदंडे तर आभार रचना फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी आरोग्य विभागातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.
आरोग्यविषयक दोन मोहिमांचा शुभारंभ
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मातृवंदना योजनेची व्यापक प्रसिद्धी होण्यासाठी शासनामार्फत सुपोषित जननी विकसित धारणी कार्यक्रम ८ ते २२ मार्च या कालावधीत राबविला जाणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी करण्यात आला.
कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सामान्यत: कर्करोग तपासणी मोहीम ७ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत राबविली जात आहे. या मोहिमेचा सुद्धा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमस्थळी उपस्थित आशा स्वयंसेविकांची मौखिक तपासणी दंत चिकित्सक डॉ.नंदू मेश्राम, डॉ.रिना मेश्राम यांनी केली. तसेच आशांना यावर मार्गदर्शन केले.