सावधान! चिचडाेह बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडणार; १ जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 08:44 PM2023-05-24T20:44:50+5:302023-05-24T20:45:20+5:30
Gadchiroli News यंदा १ जूनपासून पावसाळा सुरू हाेणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने पुढील धाेका ओळखून पाण्याची पातळी कमी करण्यासाठी चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ दरवाजे १ जून राेजी उघडले जाणार आहेत.
गडचिरोली : गडचिराेली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ किमी अंतरावर अंतरावर चिचडोह बॅरेज आहे. सात महिन्यापूर्वी बॅरेजचे दरवाजे बंद केले हाेते. तेव्हापासून येथे भरपूर पाणीसाठा आहे. यंदा १ जूनपासून पावसाळा सुरू हाेणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने पुढील धाेका ओळखून पाण्याची पातळी कमी करण्यासाठी चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ दरवाजे १ जून राेजी उघडले जाणार आहेत. याबाबत बॅरेज खालील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा चंद्रपूरच्या लघु पाटबंधारे विभागाने दिला.
चिचडाेह बॅरेजचे सर्व दरवाजे १५ ऑक्टोबर २०२२ राेजी बंद करण्यात आले होते. यावर्षी १ जूनपासून पावसाळा सुरू हाेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. लवकर पावसाळा सुरू झाल्यास पूर परिस्थिती निर्माण हाेईल. हा धाेका ओळखून बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व ३८ दरवाजे १ जून राेजी उघडण्याचे नियोजन आहे. पाणी साेडल्यास बॅरेजच्या निम्न भागातील नदीतील पाण्याची पातळी वाढेल. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी लघु पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला. विशेष म्हणजे, बॅरेजचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झाले. मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस ४ किमी वर बॅरेज आहे. बॅरेजची एकूण लांबी ६९१ मीटर असून १५ मीटर लांब बाय ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविले आहेत.
नागरिकांनी काय करू नये ?
बॅरेजमधून पाणी साेडल्यानंतर पाणी पातळी वाढेल. परिणामी जीवित व वित्त हानी होऊ शकते. ही हानी हाेऊ नये यासाठी पाणी साेडण्याच्या कालावधीत नदी काठावर जाणे टाळावे, तसेच नदीकाठावरील शेतीत कामे करताना सतर्क राहावे. मार्कंडा देवस्थानात येणाऱ्या यात्रेकरुंनी नदीवर आंघोळ करताना खबरदारी घ्यावी, मासेमार, नदीघाटातून वाळू काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी कळविले.
गडचिराेलीतील २१ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १७ गावे
गडचिराेली जिल्ह्यातील एकूण २१ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १७ गावे वैनगंगा नदीच्या चिचडाेह बॅरेजच्या बाधित क्षेत्रात येतात. यामध्ये गडचिराेली तालुक्यातील डाेंगरगावसह अन्य तीन अशी चार गावे,तर चामाेर्शी तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. वैनगंगा नदीकाठावरील दुसऱ्या बाजूच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील एकूण १७ गावांचा बाधित क्षेत्रात समावेश आहे.