भोंदूबाबापासून सावध राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:18 PM2017-11-18T23:18:57+5:302017-11-18T23:19:21+5:30
समाजातील भोळ्याभाबड्या लोकांचा फायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेच्या खाईत ढकल्याचे काम भोंदूबाबा व मांत्रिकाकडून केले जात आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : समाजातील भोळ्याभाबड्या लोकांचा फायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेच्या खाईत ढकल्याचे काम भोंदूबाबा व मांत्रिकाकडून केले जात आहे. जगात तंत्र, मंत्र, विद्या काही नसते. हे भोंदू केवळ लोकांना मुर्ख बनवत आहेत. त्यामुळे भूतांची भिती दाखवून लुबाडणाºया भोंदूबाबापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक सचिव प्रा. श्याम मानव यांनी केले.
गडचिरोली पोलीस दल व अंनिसच्या संयुक्त विद्यमाने येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात जादूटोणाविरोधी कायद्याच्या तरतुदीबाबत त्यांचे जाहीर व्याख्यान मंगळवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेंद्र पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, सुरेश झुरमुरे, हरिभाऊ पाथोडे, अॅड. गोविंद भेंडारकर, मनोहर हेपट, पुष्पा चौधरी, पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे, नलावडे, जगदिश बद्रे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. मानव यांनी अंगठी व सोनसाखळी हवेत काढण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अंधश्रध्देला बळी पडू नका, असे आवाहन केले. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना जादूटोणा कायद्याबद्दल बुधवारी मार्गदर्शन केले.