विजेच्या उपकरणांपासून सावधानता बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:41 AM2021-09-05T04:41:14+5:302021-09-05T04:41:14+5:30
महावितरणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावर असते. त्यामुळे वादळ-वारा, जोराचा पाऊस आला, तर या उघड्यावरील यंत्रणेवर त्याचा परिणाम होऊन वीजपुरवठा विस्कळीत ...
महावितरणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावर असते. त्यामुळे वादळ-वारा, जोराचा पाऊस आला, तर या उघड्यावरील यंत्रणेवर त्याचा परिणाम होऊन वीजपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. वीजपुरवठा विस्कळीत होताच, महावितरणच्या यंत्रणेकडून त्याची तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स, तसेच घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्विच बोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे.
मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीज तारांवर पडतात, तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी, वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने, अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, संभाव्य अपघात टाळण्यासाठी महावितरण खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या विजेच्या तारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे .
बाॅक्स :
अशी करा तक्रार
- वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावरून ०२२ - ४१०७८५०० या क्रमांकावर मिस्ड कॉल करावा, महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाइल क्रमांकावर तक्रार पाठविल्यास ती नोंदविली जाणार आहे. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय आहे.
- महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. वीज ग्राहकाने कॉल सेंटरमध्ये रजिस्टर्ड केलेल्या तीनपैकी कोणत्याही वैयक्तिक दूरध्वनी किंवा मोबाइल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे.