नागालँडच्या जामींच्या मृत्यूने भामरागड हळहळले
By Admin | Published: April 18, 2017 01:01 AM2017-04-18T01:01:04+5:302017-04-18T01:01:04+5:30
भामरागड तालुक्यात मागील एक वर्षापासून दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत जाऊन आरोग्य सेवा पुरविणारे डॉ. आर. एल. जामी यांच्या ....
वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही आरोप : सोशल मीडियावर मृत्यूबाबत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी
भामरागड/गडचिरोली : भामरागड तालुक्यात मागील एक वर्षापासून दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत जाऊन आरोग्य सेवा पुरविणारे डॉ. आर. एल. जामी यांच्या अकस्मात मृत्यूने भामरागड व परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे.
२० मार्च २०१६ पासून भामरागड परिसरात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. जामी हे कार्यरत होते. अवघ्या काही कालावधीतच त्यांनी या भागात स्वत:च्या कार्यशैलीने छाप पाडली होती. सर्वसामान्यांना आपलेसे वाटणाऱ्या या डॉक्टरचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी रविवारी येताच भामरागड ग्रामीण रूग्णालयासमोर ३०० च्यावर नागरिक उपस्थित होते. त्यांचा प्रचंड रोष आरोग्य शिबिर आयोजित करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होता. लाहेरी पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. अमित साळवे यांनी तक्रार नोंदविली. या तक्रारीत साळवे यांनी १६ एप्रिल रोजी मॅग्मो संघटनेच्या वतीने आरोग्य तपासणीचे शिबिर बिनागुंडा व कुवाकोडी या ठिकाणी घेण्यासाठी गडचिरोली व भामरागडच्या डॉक्टरांचे पथक गेले होते. यातील काही डॉक्टर कुवाकोडी येथे गेले. तर काही डॉक्टर बिनागुंडा येथे थांबले व काही लोक धबधब्यावर आंघोळ करीत होते. त्यातच डॉ. रूंगचो जामी यांचाही समावेश होता. पाण्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. साळवे यांनी लाहेरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे सदर डॉक्टरांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर आरोग्य शिबिरासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या वर्तनाबाबत प्रचंड चर्चा सुरू आहे. या शिबिराची कुणालाही माहिती नव्हती. डॉ. जामी यांच्या मृत्यूनंतर ही बाब समोर आली व सहलीसाठी गेलेल्या या डॉक्टरांनी आरोग्य शिबिराचा फार्स निर्माण केला. आरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत पूर्व नियोजीत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. सुटीच्या दिवशी हे शिबिर घेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेचे नाव समोर करून हे प्रकरण अंगावर शेकू न देण्याची भूमिका सहभागी डॉक्टर घेत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. खरोखरच आरोग्य शिबिरासाठी हे डॉक्टर आले होते काय, एवढ्या दुर्गम व संवेदनशील भागात जाण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती काय, आदी अनेक प्रश्न डॉ. जामी यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावरून भामरागड भागातील नागरिकांसह जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित केले आहे. याचे समाधानकारक उत्तर शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लोकमतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, कुणीही ठोसपणे काहीही सांगू शकले नाही. घटना दुर्दैवी झाली, एवढेच त्यांनी सांगितले.
डॉक्टर जामी यांना चांगल्या प्रकारचे पोहणे येत होते. असे असताना त्यांचा मृत्यू कसा होऊ शकतो. ते रोज भामरागडला नदीवर आंघोळ करायचे. अशा माणसाला पाण्याची भिती कशी वाटेल, आदी अनेक प्रश्न या मृत्यूने निर्माण केले आहेत. या आरोग्य शिबिरासाठी जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी भामरागडवासीयांनी केली आहे. यातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना धड चालता येत नव्हते, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी लोकमतशी बोलताना दिली. नार्थ इस्ट भागातून येऊन नागालँडचे डॉ. जामी येथे सेवा देतात व त्यांचा अकाली मृत्यू होतो. यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मानही झुकली आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.