भामरागडची शाळा होणार आंतरराष्ट्रीय दर्जाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:49 PM2018-01-09T22:49:05+5:302018-01-09T22:50:02+5:30
भामरागड येथील समूह निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : भामरागड येथील समूह निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातील बरीचशी प्रक्रिया आटोपली असून केवळ शासनाची मोहर लागण्याचे काम सुरू झाले आहे.
राज्यभरातील १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यापैकी १० शाळा तत्काळ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केल्या जाणार आहेत. यामध्ये नागपूर विभागातील दोन शाळांची निवड करायची होती. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील समूह निवासी शाळेची निवड करण्यात आली आहे. भामरागड हा आदिवासीबहुल तालुका आहे. या शाळेत निवासाची सुविधा असल्याने बहुतांश आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. सद्य:स्थितीत या ठिकाणी ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणची पटसंख्या एक हजार राहणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरानुसार ज्या सुविधा आवश्यक आहेत, त्या सर्व सुविधा या शाळेमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. क्रीडांगण, अत्याधुनिक वर्गखोली, चांगले अध्यापन करणारे अध्यापक या शाळेमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
लोणावळा येथे प्रशिक्षण
आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण करण्यासाठी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत. शासनाकडून कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, याबाबतची माहिती व प्रशिक्षण लोणावळा येथे देण्यात आले. यावेळी भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावने, केंद्रप्रमुख गुरूदास गोमासे, समूह शाळेचे मुख्याध्यापक रामाजी नरोटे आदी उपस्थित होते. कंपन्यांच्या सीएसआरमधून इमारत बांधकाम व सोईसुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.