भामरागड-ताडगाव मार्ग चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:20 AM2018-07-05T00:20:55+5:302018-07-05T00:22:29+5:30
भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे. यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले असून वाहनधारकांना या मातीचा त्रास आता पावसाळाभर सहन करावा लागणार आहे.
भामरागड-आलापल्ली मार्गावर असलेल्या ताडगाव येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ताडगाव भामरागडपासून १२ किमी अंतरावर आहे. भामरागड, आलापल्ली मार्गाची दुरूस्ती झाली नसल्याने या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. ताडगाव येथील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी उपस्थित राहणार होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याचे कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदाराने चांगले मुरूम न टाकता माती मिश्रीत मुरूम टाकले. पावसामुळे व वाहनांच्या रहदारीमुळे खड्ड्यांमधील मातीमिश्रीत मुरूम बाहेर पडल्याने आता चिखल झाला आहे. संपूर्ण डांबरी रस्त्यावर चिखल पसरला आहे. चिखल वाहनाच्या टायरला चिपकत असल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. त्याचबरोबर सदर चिखल वाहनधारकावरही पडत असल्याने कपडे खराब होत आहेत. बांधकाम विभागाबद्दल नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.
इतरही रस्त्यांची दयनीय अवस्था
भामरागड तालुका नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहे. भामरागड तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केला जाईल. या तालुक्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्याला कमी निधी दिला जातो. बांधकाम विभागाचीही तिच स्थिती आहे. निधीअभावी तालुक्यातील अनेक रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी झाली नाही. तर काही गावे अजूनपर्यंत रस्त्याने सुद्धा जोडण्यात आले नाही. रस्तेच नसल्याने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी त्या गावापर्यंत पोहोचत नाही. गावातील नागरिकही कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही तक्रार करीत नाही. परिणामी भामरागड तालुक्याचा विकास रखडला आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.