भामरागड तालुक्याचा विकास कागदावर
By admin | Published: March 12, 2016 01:42 AM2016-03-12T01:42:17+5:302016-03-12T01:42:17+5:30
भामरागड तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून प्राप्त होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री भामरागड तालुक्याच्या विकासाकडे कानाडोळा करीत आहेत.
कर्मचाऱ्यांअभावी शहराचा विकास रखडला : न. पं. सभापतींचा शासनावर आरोप
भामरागड : भामरागड तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून प्राप्त होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री भामरागड तालुक्याच्या विकासाकडे कानाडोळा करीत आहेत. भामरागड तालुक्यात अनेक समस्या कायम असून या तालुक्याचा विकास केवळ कागदावरच आहे, असा आरोप नगर पंचायतीचे बांधकाम सभापती हरिदास रापेलीवार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी माहिती देताना सभापती रापेलीवार म्हणाले, विकास करण्याच्या उद्देशाने भाजप सरकारने तालुकास्तरावरील सर्व ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर केले. मात्र नगर पंचायतीच्या विकासात अनेक अडचणी कायम आहेत. भामरागड नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार परसे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र अभियंता, लेखापाल, लिपीक, शिपाई व इतर पदे रिक्त आहेत. भामरागड नगर पंचायतीला विकासासाठी शासनाने १३७ लाख रूपयांचा निधी दिला आहे. मात्र या नगर पंचायतीत अभियंत्याचे पद रिक्त असल्याने सदर निधी कसा खर्च करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही रापेलीवार यावेळी म्हणाले.
यापूर्वी प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या तहसीलदारांनी एकूण निधीपैकी केवळ १५ ते २० लाख रूपये खर्च केले. मात्र या खर्चाचा हिशोब अद्यापही दिला नाही. नाली सफाईवर सदर निधी खर्च केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र हिशोब सादर न केल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भामरागड शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येथील पाणीपुरवठा योजना नादुरूस्त असून त्याच्या दुरूस्तीसाठी ४० लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. हातपंप दुरूस्ती व देखभालीची ७ लाख ७७ हजार रूपयांची रक्कम थकीत आहे. ही थकबाकी नगर पंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीची आहे. नगर पंचायत प्रशासन हातपंप दुरूस्त करून पाणीटंचाईची समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहे. नगर पंचायतीच्या विकासासाठी निधी दिला. मात्र नियोजन देण्यात आले नाही. विकासासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. मात्र नियुक्तीकडे शासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी प्रचंड दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोेप रापेलीवार यांनी यावेळी केला. (तालुका प्रतिनिधी)