भामरागड तालुक्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:34 AM2018-07-08T00:34:12+5:302018-07-08T00:35:01+5:30
शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भामरागडसह तालुक्यात दमदार पाऊस झाला. जवळपास दोन तास मुक्काम ठोकत पावसाने भामरागड तालुक्याला झोडपून काढले. मुसळधार
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भामरागडसह तालुक्यात दमदार पाऊस झाला. जवळपास दोन तास मुक्काम ठोकत पावसाने भामरागड तालुक्याला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे भामरागड येथील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते.
छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यामुळे या तालुक्यात दरवर्षी सर्वाधिक पाऊस पडते. यावर्षी सुध्दा भामरागड तालुक्यात सुरूवातीपासून दमदार पाऊस सुरू आहे. चार दिवसांपूर्वी पामुलगौतम नदीला अचानक पाणी वाढल्याने तीन महिला वाहून गेल्या होत्या. भामरागड तालुक्यातून पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या तीन नद्या वाहतात. सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने या तिन्ही नद्यांना जिल्ह्यातील इतर नद्यांच्या तुलनेत अधिक पाणी होते.
भामरागड तालुक्यात मुख्यत: धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धानाचे पºहे टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. शेतकरी वर्ग आता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत होता. शनिवारी झालेल्या पावसाने शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रविवारपासून रोवणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इतर ठिकाणी प्रतीक्षा
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अजुनही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे रोवणीच्या कामांना सुरूवात झाली नाही. अजुनही शेतकरी वर्ग दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाच शेतकºयांनी रोवणी सुरू केली आहे.