सामूहिक वनहक्क दाव्यात भामरागड तालुक्याची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:26 AM2021-02-19T04:26:48+5:302021-02-19T04:26:48+5:30
भामरागड तालुका हा मुख्यत्वे गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका अतिदुर्गम ...
भामरागड तालुका हा मुख्यत्वे गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका अतिदुर्गम आणि डोंगरदऱ्यांनी व्याप्त व अविकसित आहे. हा तालुका बांबूकरिता प्रसिद्धद आहे. तालुक्यातील लोकांचा व्यवसाय शेती असून, जंगलातील वनोपजावरदेखील त्यांचे जीवन अवलंबून आहे. तालुक्यात एकूण १२८ गावे असून, त्यापैकी अतिदुर्गम व अतिमागास बिनागुंडा, कुव्वाकोडी पेरमलभट्टी, दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा या गावांतील लोक मागील कित्येक वर्षांपासून सामूहिक वनहक्क मिळण्यापासून वंचित होते; परंतु जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे, तसेच त्यांच्या अधिनस्थ तलाठी वृषभ हिचामी, सर्व कोतवाल यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण केली. स्थानिक कोतवाल रायधर बाकडा, मारुती दूर्वा, चुक्कू उसेंडी, सत्तू पोदाळी, दिनकर उसेंडी, शंकर मडावी, आकाश काळंगा, तसेच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चौव्हाण व त्यांचे अधिनस्थ क्षेत्रपाल व वनरक्षकांच्या प्रयत्नांमुळे या गावातील लोकांना सामूहिक वनहक्क मिळविण्याच्या प्रक्रियेत मदत मिळाली.
सदर सामूहिक वनहक्क दावे लवकरात लवकर मंजूर होण्याकरिता जिल्हाधिकारी दीपक सिंगला व उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांनी जिल्हास्तरीय वनहक्क समितीमार्फत सदर वनहक्क दावे त्वरित मंजूर होण्याकरिता विशेष प्रयत्न केले. आता भामरागड तालुका १०० टक्के सामूहिक वनहक्क दावे मंजूर झालेला तालुका म्हणून ओळखला जाईल.
शासनाच्या वतीने जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून सामूहिक वनहक्क मान्य करण्यात आलेल्या गावांतील लोकांचे उपविभागीय अधिकारी मनुजकुमार जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली मौजा बिनागुंडा याठिकाणी शिबिर घेण्यात आले. त्या शिबिरात मौजा बिनागुंडा, कुव्वाकोडी, पेरमलभट्टी, दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा गावांतील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
उपस्थित नागरिकांनी आपापल्या गावातील रस्ते, आरोग्य व शिक्षणाशी संबंधित समस्या मांडून त्या सोडविण्याची विनंती केली. त्यानुसार बिनागुंडा येथील विनोबा शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन त्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन एसडीओ जिंदल यांनी यावेळी दिले.
(बॉक्स)
रोजगाराला मिळणार चालना
- सामूहिक वनहक्क न मिळाल्यामुळे आजपर्यंत लोक बांबू कटाई करू शकत नव्हते. त्यामुळे गावातील लोकांना बाराही महिने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या; परंतु सामूहिक वनहक्क मिळाल्यामुळे बांबू कटाई शक्य होईल व रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
- यावेळी उपविभागीय अधिकारी मनुजकुमार जिंदल यांनी सामूहिक वनहक्काचे व्यवस्थापन, संरक्षण, पुनर्निर्माण व संवर्धन करण्याकरिता नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब करावा व ग्रामसभेचे बळकटीकरण व्हावे याबाबत मार्गदर्शन केलेे.