आम्ही बदला घेऊ... नक्षल संघटनेकडून एकनाथ शिंदेंना धमकीचं पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 01:51 PM2021-10-29T13:51:24+5:302021-10-29T14:17:26+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीने ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीने ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सम्पूर्ण प्रकरणाची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालकमंत्री शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीच्या नावाने आलेल्या या पत्रात 'तुम्ही गडचिरोलीचा खूप विकास करीत आहात. पण आम्हाला मोठी समस्या निर्माण करीत आहात. पोलिसांच्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. याचा आम्ही नक्कीच बदला घेऊ, असा इशारा ठाण्यातील लुईसवाडीतील नंदनवन या निवासस्थानी आठ दिवसांपूर्वी हे पत्र आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गडचिरोली पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे हे गडचिरोली प्रमाणेच ठाणे जिल्हयाचे देखील पालकमंत्री आहेत. गेल्या काही महिन्यात त्यांनी गडचिरोली येथे विकास कामांचा धडाका लावला. त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले, त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील नक्षलवादी नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच नारजीतून त्यांना हे पत्र आल्याचे बोलले जात आहे.
हे धमकीचे पत्र मुंबईतील त्यांच्या शासकीय बंगल्यावरही पाठवण्यात आले होते. त्या संदर्भात मुंबईतील पोलीस तपास करत असून ठाण्यातदेखील हे पत्र कोणी पाठवले या संदर्भात तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या पत्राबाबत शिंदे यांना विचारले असता, यावर नंतर प्रतिक्रिया देईन, असे सांगत ते कोल्हापूर दौऱ्याला निघून गेले.