विदर्भातील सप्तधामांपैकी एक वैरागडचे भंडारेश्वर; तीन दिवस उसळणार भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 04:54 PM2023-02-18T16:54:30+5:302023-02-18T16:54:54+5:30
दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते
प्रदीप बाेडणे
वैरागड (गडचिरोली) : वैरागड गावाच्या उत्तरेला धानोरा मार्गालगत खोब्रागडी नदीच्या काठावर एका उंच टेकडीवर भंडारेश्वरचे मंदिर आहे. विदर्भातील सप्तधामांपैकी एक मंदिर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. यावर्षी १७ ते १९ फेब्रुवारी असे तीन दिवस ही यात्रा भरणार आहे.
आरमोरी तालुका मुख्यालयापासून १५ कि.मी. अंतरावर वैरागड हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वराचे मंदिर, गोरजाई मंदिर, पाच पांडव, आदिशक्ती मातेची मूर्ती व इतर हेमाडपंथी मंदिरे आहेत. तत्कालीन गोंड राजाची मोठी भावसून रानी हिराई देवी हिने आपल्या नवऱ्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ भंडारेश्वराचे मंदिर बांधले. भंडारेश्वर मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी अगदी सुरुवातीला उजव्या सोंडेचा गणपती असून, मंजूर मंदिराच्या चारी बाजू विष्णू, लक्ष्मी, शंकर-पार्वती अशा देवीदेवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत. वास्तुकलेतील उत्तम नमुना ठरावा या धाटणीने मंदिराची बांधणी केली आहे.
पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या भंडारेश्वर मंदिराचे व टेकडी परिसराचे सौंदर्यीकरण मागील वर्षी करण्यात आले. मंदिराच्या मागच्या बाजूला नदीपात्रात जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या, तसेच टेकडीच्या पायथ्यापासून तर मंदिरापर्यंत भाविकांना पोहोचता यावे म्हणून पुरातत्त्व विभागाने जुन्या कामकाजाचे स्वरूप कायम ठेवून पायऱ्याचे बांधकाम केले व महसूल दप्तरी असलेल्या जागेत संरक्षक भिंतीचे काम केले. यात्रेदरम्यान किंवा इतर वेळी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत.
सुविधांसह याेजनांबाबत जागृती
महाशिवरात्री दरम्यान तीन दिवस भरणाऱ्या यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून तहसील प्रशासनाकडून, तसेच भंडारेश्वर समितीकडून भाविकांना पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा व यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी म्हणून विविध विभागातर्फे या ठिकाणी स्टॉल लावून शासनाच्या योजनांची जनजागृती यात्रेदरम्यान केली जाते. भंडारेश्वर मंदिराची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनाला येतात.