पावसाअभावी धानरोवणी खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:36 AM2018-08-11T01:36:18+5:302018-08-11T01:38:25+5:30
मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने कुरखेडा तालुक्यातील पुराडा परिसरातील रोवणीची कामे थांबली आहेत. त्यामुळे यावर्षी सुध्दा धानपीक संकटात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला पाऊस अगदी वेळेवर पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुराडा : मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने कुरखेडा तालुक्यातील पुराडा परिसरातील रोवणीची कामे थांबली आहेत. त्यामुळे यावर्षी सुध्दा धानपीक संकटात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला पाऊस अगदी वेळेवर पडला. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकणी व रोवणी धरणे ही कामे अगदी वेळेवर सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतली आहे. मागील १५ दिवसांपासून कुरखेडा तालुक्यात पावसाने दडी मारली असून दिवसा कडक ऊन पडत आहे. धानाची रोवणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. मात्र १५ दिवसांपासून पाऊस झाला नाही. त्यामुळे रोवणीची कामे थांबली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाच शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. ज्या शेतकºयांनी रोवणी केली, अशाही शेतकऱ्यांचे धानपीक संकटात सापडले आहे. धानाच्या बांधीत पाण्याअभावी फटी गेले आहेत. पुन्हा चार ते पाच दिवस पाऊस न होता कडक ऊन शेकल्यास रोवलेले धानपीकही करपण्याची शक्यता आहे. मागील वर्षी धानपिकावर मावा, तुडतुडाने हल्ला केला होता. त्यामुळे हातात आलेले पीक मावा, तुडतुड्याने फस्त केले. यावर्षी तरी चांगले उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र यावर्षी सुध्दा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्पादनात घट निश्चित
धान पिकाची रोवणी जेवढी उशिरा होते, तेवढी उत्पादनात घट होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी आॅगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजूनही रोवणी झाली नाही. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकºयांचे रोवणे झाले आहेत, असेही धान आता पाण्याअभावी करपायला लागले आहे. त्याचाही परिणाम उत्पादनावर होणार आहे.