‘भीम सेतू’ला चुकांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:52 PM2018-07-14T23:52:19+5:302018-07-14T23:52:49+5:30

कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले.

'Bhima Setu' receives eclipse | ‘भीम सेतू’ला चुकांचे ग्रहण

‘भीम सेतू’ला चुकांचे ग्रहण

Next
ठळक मुद्देकच्चे बांधकाम : पुरात वाहून गेला दोन्ही बाजूंचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच पुलाच्या दोन्ही बाजूकडील माती वाहून गेल्याने पुन्हा नागरिकांना नाला पार करताना कसरत करावी लागत आहे.
अहेरी तालुक्यातील पेरमिली-येरमणार लगतच्या परिसरात असलेला येरमणार नाला उन्हाळ्यात कोरडा पडतो. त्यामुळे नाल्यातून पलिकडे जाणे सर्वांना सहज शक्य होते. मात्र पावसाळ्याला सुरूवात होताच हा नाला पुन्हा प्रवाहित होतो आणि मग पुढचे ५ ते ६ महिने नागरिकांना वाहत्या पाण्यातूनच पैलतिर गाठावे लागते. या नाल्यावर पूल बांधण्याचा प्रयत्न केला तरी नक्षलदृष्ट्या अतिसंवेदन भागामुळे कंत्राटदार हे काम घेण्यास तयार होत नाही. अशा परिस्थितीत भूमकाल संघटनेने गावकºयांच्या मदतीतून या पुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव ठेवला. पोलिसांनीही तो मान्य करून सर्व ती मदत करण्याची हमी दिली. मात्र पूल उभारण्याची वेळ चुकली. अगदी पावसाळ्याच्या तोंडावर जेमतेम १८ ते २० दिवसांत हा पूल उभा करण्यात आला. त्यामुळे त्यात काही तांत्रिक चुकाही राहिल्या. ७ जूनला पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर लगेच पावसाला सुरूवात झाली. काही दिवस वाहत्या पाण्यातही पूल तग धरून होता. मात्र सततच्या पावसात पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजुकडील रस्त्याला जोडणाºया बाजूची माती वाहून गेली. त्यामुळे पुलाचा मधल्या भागातील ढाचा कायम असला तरी दोन्ही बाजू खंडित झाल्याने पुलावर जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
प्रशासनाने बांधकाम विभागाच्या मदतीने पुलाची योग्य ती दुरूस्ती करून हा पूल लवकरात लवकर पुन्हा सुरू करावा आणि १५ ते २० गावांतील नागरिकांचा संपर्क पुन्हा जोडावा अशी अपेक्षा त्या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: 'Bhima Setu' receives eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.