सहाव्या दिवशीही भिमपूरच्या शिक्षकांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2016 01:15 AM2016-09-09T01:15:34+5:302016-09-09T01:15:34+5:30
कारण नसतानाही तसेच शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता तालुक्यातील भीमपूर
६ सप्टेंबरला दिली सुटी : नागरिकांची सभापतींकडे तक्रार
कोरची : कारण नसतानाही तसेच शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता तालुक्यातील भीमपूर येथील मुख्याध्यापकांनी ६ सप्टेंबर रोजी अधिकारातील सुटी जाहीर केली. याबद्दलची पूर्व कल्पना विद्यार्थ्यांना सुद्धा दिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून परतावे लागले. ६ सप्टेंबर रोजी दिलेली सुटी अवैध असून या दिवसाचे वेतन कपात करण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे.
१ व २ सप्टेंबर रोजी पोळ्यानिमित्त सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापकांनी ३ सप्टेंबर रोजी स्वत:च्या अधिकारातील सुटी दिली होती. ४ सप्टेंबर रोजी रविवार आला. ५ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची सुटी जाहीर करण्यात आली होती. म्हणजेच सलग पाच दिवसांच्या सुट्यांचा आनंद शिक्षकांनी उपभोगला होता. तरीही ६ सप्टेंबर रोजी स्वत:च्या अधिकारातील आणखी सुटी जाहीर केली. सदर सुटी आकस्मिकरित्या देण्यात आली होती. याबद्दलची कोणतीही पूर्व सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर विद्यार्थी शाळेमध्ये पोहोचले. दुपारी १२ वाजेपर्यंत शिक्षकांची वाट बघितली. मात्र शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकही आले नाही. शिक्षकांची वाट बघून त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी घराकडचा रस्ता धरला. ही बाब पालकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, स्वत:च्या अधिकारातील सुटी दिल्याचे सांगितले. ३ सप्टेंबर रोजीच स्वत:च्या अधिकारातील सुटी दिली असतानाही आणखी ६ सप्टेंबर रोजी सुटी देण्याचे कारण काय, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात आला.
याबाबतची तक्रार गावकरी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी कोरचीचे सभापती यांच्याकडे केली. संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मुख्यालयी राहण्याबाबत अनेकवेळा बजावून सुद्धा यातील एकही शिक्षक मुख्यालयी राहत नाही. मुख्याध्यापक प्रभू वैद्य हे भीमपूरपासून ८० किमी अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरीवरून ये-जा करतात. ते किती वाजता शाळेमध्ये येतात व जातात, याचे उत्तर त्यांनाच विचारावे, असा प्रतिप्रश्न सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सभापतींकडे उपस्थित केला. ६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सुटी अवैध असून या दिवसाचे शिक्षक व मुख्याध्यापकांचे वेतन कपात करावे, अशी मागणी केली आहे.