भुजबळांचा राजीनामा स्वीकारला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
By संजय तिपाले | Published: February 3, 2024 10:11 PM2024-02-03T22:11:35+5:302024-02-03T22:11:45+5:30
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झालेले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही, असा खुलासा केला.
गडचिरोली: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झालेले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही, असा खुलासा केला. येथे ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित गडचिरोली महोत्सवाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आले होते. रात्री सव्वानऊ वाजता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, याबाबत मुख्यमंत्री अधिक विस्ताराने सांगू शकतील, पण मुख्यमंत्र्यांनी किंवा मी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.
१६ नोव्हेंंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला ओबीसी सभेला गेल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी अहमदनगर येथील मेळाव्यात ३ फेब्रुवारीला दुपारी केला होता. यावेळी त्यांनी राजीनाम्यावरुन कथित वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरही निशाणा साधला. शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, कथित गोळीबार प्रकरणाने चर्चेत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले.