वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाचे आज भूमिपूजन
By admin | Published: May 9, 2017 12:45 AM2017-05-09T00:45:01+5:302017-05-09T00:45:01+5:30
५२.०५ किमी लांबीच्या वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाचे भूमीपूजन ९ मे रोजी मंगळवारला सकाळी ११.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आॅनलाईन पध्दतीने होणार आहे.
खासदारांची माहिती : नागपुरात कार्यक्रमाचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ५२.०५ किमी लांबीच्या वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाचे भूमीपूजन ९ मे रोजी मंगळवारला सकाळी ११.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आॅनलाईन पध्दतीने होणार आहे. सदर कामाचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी सोमवारी सर्कीट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी सांगितले की, वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी १६१ कोटी रूपये आपण केंद्र सरकारकडून खेचून आणले. राज्य सरकारनेही आपल्या ५० टक्के वाट्याच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. सदर मार्गाच्या भूमी अधीग्रहणाचे काम गतीने सुरू आहे. नागपूर येथे होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, वने व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. याच ठिकाणी वर्धा-नागपूर, नागपूर-इटारशी, वर्धा-बल्लारशहा रेल्वेमार्गाच्या लाईनचे तसेच इतर विकासात्मक कामांचे भूमिपूजन होणार आहे, असेही खा. नेते यांनी सांगितले. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात उद्योग वाढीस चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, प्रमोद पिपरे, स्वप्नील वरघंटे, जि.प. सदस्य मिना कोडाप, रेखा डोळस, जावेद अली हजर होते.