मोठी दुर्घटना! मिरची तोडण्यासाठी जाणाऱ्या महिलांची नाव वैनगंगा नदीत उलटली; सहा जणी बुडाल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 02:42 PM2024-01-23T14:42:47+5:302024-01-23T14:43:29+5:30
गडचिरोलीच्या चार्मोशी तालुक्यातून मोठी बातमी येत आहे. वैनगंगा नदीमध्ये मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटली आहे. या दुर्घटनेत सहा महिला ...
गडचिरोलीच्या चार्मोशी तालुक्यातून मोठी बातमी येत आहे. वैनगंगा नदीमध्ये मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटली आहे. या दुर्घटनेत सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत. बुडालेल्या महिलांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे परंतु अद्याप यश आलेले नाहीय.
सकाळी ११ च्या सुमारास मिरची तोडणीसाठी पैलतीरावरील शेतात सहा महिलांना घेऊन होडी निघाली होती. यावेळी अचानक खोल पाण्यात होडी उलटली आणि नावाड्यासह सर्व महिला पाण्यात पडल्या. नावाड्याला पोहता येत असल्याने त्याने एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला वाचविता आले नाही, अखेर नावाड्याने पोहून किनारा गाठला व स्थानिकांना याची माहिती दिली.
दरम्यान, एका महिलेचा मृतदेह सापडला असून पाच महिला बेपत्ता आहेत. गणपूर (रै.) या गावानजीक ही घटना घडली आहे. घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांकडून शोधकार्य सुरु आहे. नदी पुलाची किंवा वाहतुकीची सोय नसल्याने गणपूरहून वैनगंगा नदीपात्रातून वाहतूक करत जीवघेणा प्रवास केला जातो.