गरिबी व अपंगत्वावर मात करून विशालची भरारी
By admin | Published: June 17, 2017 02:00 AM2017-06-17T02:00:41+5:302017-06-17T02:00:41+5:30
अपंगत्व आणि गरिबीचा डोंगर पाठीवर घेऊन एखाद्या व्यक्तीने केलेली प्रगती सर्वसामान्य घरातील माणसाने
७४ टक्के गुण मिळविले : शिक्षकांनी घेतली शिक्षणाची जबाबदारी
प्रदीप बोडणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : अपंगत्व आणि गरिबीचा डोंगर पाठीवर घेऊन एखाद्या व्यक्तीने केलेली प्रगती सर्वसामान्य घरातील माणसाने केलेल्या प्रगतीपेक्षा अधिक अभिनंदनास पात्र ठरते. अशाच अभिनंदनास पात्र आहे, श्री तुकाराम विद्यालय कढोली येथे शिकणारा विशाल योगाजी नंदरधने. गरिबी आणि दोन्ही पायांनी अपंग असलेल्या विशालने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुण प्राप्त करीत शाळेतून तृतीय क्रमांक पटकाविला.
कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा या छोट्याशा गावचा विशाल जन्मत: दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. जास्तवेळ तो उभा राहू शकत नाही. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण त्याने गावातील जि. प. शाळेत पूर्ण केले. पुढील शिक्षणाची अडचण निर्माण झाल्यानंतर व घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्याने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. आठवीत प्रवेश घेण्यासाठी वडिलांच्या मागे त्याने नेहमी तगादा लावला. वडील योगाजी नंदरधने यांनी गावापासून दोन किमी अंतरावरील श्री तुकाराम विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना आपली अडचण सांगितली. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशालची शाळेत ये- जा करण्याची व्यवस्था केली. प्रत्येक दिवशी या शाळेतील शिक्षक विशालला शाळेत घेऊन जात असे. व सुटीनंतर सोडूनही देत असे. विशालच्या गरिबी असली तरी विद्येची श्रीमंती आहे. त्याची मोठी बहीण इयत्ता बारावीच्या परीक्षेत यंदा केंद्रात प्रथम आली.
पुढील शिक्षणासाठी अनेक अडचणी
दिव्यांग व्यक्तींना शासनातर्फे मिळणाऱ्या सोयी सवलती विशालला अद्यापही मिळालेल्या नाही. मागच्या वर्षी शासनातर्फे घरकूल मंजूर झाले होते. त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. स्वत:ची पदरमोड करून रक्कम गोळा करावी, अशी आर्थिक स्थिती विशालच्या वडिलांची नाही. त्यामुळे श्री तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. पुस्तोडे व शिक्षकांनी विशालच्या अकरावी व बारावीतील शिक्षणाची जबाबदारी घेऊन दिव्यांग विशालला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. मनमिळाऊ विशाल इतरांसारखा खेळू, बागळू शकत नाही. परंतु अभ्यासात व्यस्त राहून त्याने अपंगत्त्व शाप नाही हे दाखवून दिले आहे. त्याची विशाल भरारी त्याच्या जीवनात नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही.