मानवी हस्तक्षेपाने हिरावली गडचिरोलीची जैवविविधता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:46+5:30
पूर्वी जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण एवढे नव्हते. त्यामुळे गवत, पालापोचाळा जळत नव्हता. त्यातून नवनवीन वनस्पती तयार होत असत. जंगल जळत नसल्याने तृणभक्ष्यी, सरपटणारे प्राणी होते. त्यांच्यावर जगणारी मोठी श्वापदं होती. जैवविविधता टिकण्यासाठी या अन्नसाखळीतील प्रत्येक घटक तेवढाच महत्वपूर्ण आहे. तेंदूपानांसाठी जंगलांना आगी लावण्याचे प्रमाण कमी झाल्यास या जिल्ह्याच्या जंगलाला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकते.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या एकूण भूभागाच्या ७६ टक्के जंगल असल्याचे अनेक वेळा अभिमानाने सांगितले जाते. पण या जंगलात जैवविविधता किती? हा प्रश्न मात्र कोड्यात टाकणारा आहे. जंगलात वाढलेला मानवी हस्तक्षेपच गडचिरोलीतील जैवविविधता हिरावण्यास कारणीभूत ठरल्याचा निष्कर्श एकूण परिस्थितीवरून काढता येतो.
जंगलातील गवत, सरपटणाऱ्या छोट्या प्राण्यांपासून तर वाघ, हत्तीपर्यंत अनेक सजीव-निर्जीव गोष्टींचा समावेश जैवविविधतेत होतो. एकेकाळी गडचिरोलीच्या जंगलात ४० वाघांचे अस्तित्व होते. पण अलिकडच्या काही वर्षात जिल्ह्यातून वाघ नामशेष झाले. आता पुन्हा ताडोबाकडून येणाऱ्या वाघांचे अस्तित्व जाणवायला लागले असले तरी गडचिरोलीच्या जंगलात वाढलेला मानवी हस्तक्षेप, गावकऱ्यांचे अतिक्रमण, वनवणव्यांचे प्रमाण, मोठ्या रस्त्यांचे जाळे या सर्व बाबी वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे बाहेरून येत असलेले वाघासारखे प्राणी या जिल्ह्यात टिकाव धरतील का, याबद्दल साशंकता निर्माण होत आहे.
पूर्वी जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण एवढे नव्हते. त्यामुळे गवत, पालापोचाळा जळत नव्हता. त्यातून नवनवीन वनस्पती तयार होत असत. जंगल जळत नसल्याने तृणभक्ष्यी, सरपटणारे प्राणी होते. त्यांच्यावर जगणारी मोठी श्वापदं होती. जैवविविधता टिकण्यासाठी या अन्नसाखळीतील प्रत्येक घटक तेवढाच महत्वपूर्ण आहे. तेंदूपानांसाठी जंगलांना आगी लावण्याचे प्रमाण कमी झाल्यास या जिल्ह्याच्या जंगलाला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकते.
वाघ, गिधाड आणि शेकरू...
जंगलाच्या या जिल्ह्यात गेल्या काही वर्षात जंगलचा राजा, अर्थात वाघच गायब झाला होता. पण अलिकडे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांनी तिकडे जंगल अपुरे पडत असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याकडे मोर्चा वळविला असून ते या जिल्ह्यात रमलेही आहेत.
जैवविविधतेतील महत्वाचा घटक असलेल्या आणि नामशेष होत असलेल्या गिधाड पक्ष्यांचे संवर्धन गडचिरोली वनविभागाच्या पुढाकाराने गेल्या तीन वर्षांपासून केले जात आहे. त्यासाठी विविध उपाय करून गिधाडांची संख्या वाढविली जात आहे.
वनविभागाच्या घोट वनपरिक्षेत्रात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या शेकरूचे संवर्धन केले जात आहे. त्या ठिकाणच्या शेकरू पार्कमध्ये अनेक वर्षांपासून शेकरूचे वास्तव्य असले तरी त्याची माहिती अनेकांना नाही.
मानवी हस्तक्षेपामुळे गडचिरोलीत समस्या वाढली आहे. आदिवासी समाज आजही पारंपरिक शिकार करतोच. शिवाय पट्टे मिळण्यासाठी वृक्षतोड होत आहे. पेसा कायद्यामुळे काही जंगलावर ग्रामसभा अधिकार गाजवत आहे तर काही जंगल नक्षल समस्येमुळे दुर्लक्षित झाले आहे. त्यामुळे जंगलाचे, त्यातील जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षणाकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
-प्रा.सुरेश चोपणे,
पर्यावरण अभ्यासक
निसर्गचक्राची अन्नसाखळी तुटल्यामुळे या जिल्ह्यात जंगल असूनही सर्व प्रकारचे प्राणी दिसत नाही. पण अलिकडे वाघही वाढत आहे. विशेष म्हणजे गिधाडांच्या संवर्धनास चांगले यश मिळत आहे. त्यांना खाद्य पुरवण्यासाठी वनविभागाने गिधाड रेस्टॉरंटसारखे प्रयोग केले. लॉकडाऊन मध्येही ते चालू आहेत.
-सोनल भडके,
सहायक वनसंरक्षक