धान्यामध्ये विष टाकून पक्ष्यांची केली जात आहे शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:13 PM2019-03-11T22:13:22+5:302019-03-11T22:14:43+5:30
उन्हाची तिव्रता वाढत असल्याने पशु-पक्ष्यांना पाणी व चारा मिळणे कठीण झाले आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. पाणवठ्याच्या शेजारी विषात कालवलेले धान्य टाकले जात आहे. अशा प्रकारे रोज शेकडो पक्ष्यांची शिकार केली जात आहे. असा प्रकार आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील कर्रेम जंगलात रविवारी उघडकीस आला आहे.
प्रशांत ठेपाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : उन्हाची तिव्रता वाढत असल्याने पशु-पक्ष्यांना पाणी व चारा मिळणे कठीण झाले आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. पाणवठ्याच्या शेजारी विषात कालवलेले धान्य टाकले जात आहे. अशा प्रकारे रोज शेकडो पक्ष्यांची शिकार केली जात आहे. असा प्रकार आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील कर्रेम जंगलात रविवारी उघडकीस आला आहे.
जंगलातील पशु-पक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वनविभागाने अनेक ठिकाणी वनतलाव खोदले आहेत. मार्च महिन्याला सुरूवात होताच तापमानात वाढ झाली आहे. पानझडीला सुरूवात झाली असल्याने पशु-पक्ष्यांना त्यांचे खाद्य मिळणे कठीण झाले आहे. अशातच पाणवठ्यांजवळ हिरवळ व थंडावा राहत असल्याने सदर ठिकाण पशु-पक्ष्यांचे लक्ष वेधून घेत आहे. परिणामी पाणवठ्यांच्या सभोवताल पशु-पक्ष्यांची दिवसभर गर्दी दिसून येत आहे. याचा फायदा शिकाऱ्यांकडून उचलला जात आहे. यापूर्वी टोपली किंवा जाळीच्या सहाय्याने पक्ष्यांची शिकार केली जात होती. आता मात्र विषारी धान्य टाकून पक्ष्यांची शिकार करण्याचा नवीनच शोध शिकाऱ्यांनी लावला असल्याचे दिसून येत आहे. हिरव्यागार झाडाच्या खाली धान्य टाकून ठेवले जाते. या धान्याला जल स्वरूपात असलेले विष लावले राहते. भुकेने व्याकुळ झालेले पक्षी सदर धान्य खातात. धान्य खाताच काही वेळाने पक्ष्यांचा मृत्यू होतो. काही पक्ष्यांची उडण्याची क्षमताच कमी होतो. तर काही पक्षी चक्कर येऊन झाडावरून पडतात. शिकारी अगदी बाजूलाच बसलेला असतो. पक्षी झाडावरून पडताच त्याला उचलले जाते. प्रतिनीधीने शिकाऱ्यांच्या थैलीत बघीतले असता त्याच्या थैलीत चार ते पाच जंगली कबुत्तर दिसून आले. त्याला विचारले असता पक्ष्याची शिकार कशी केली जाते, याविषयीची माहिती प्रतिनिधीला दिली. तसेच धान्यामध्ये टाकण्यासाठी वापरण्यात येणारे विष एटापल्ली किंवा सुदरनगर येथे मिळते असे सांगीतले. विषाच्या बॉटलचे नेमके नाव मात्र त्याला माहीत नाही. विशेष म्हणजे पक्ष्यांची शिकार विशिष्ट समाजाचे व्यक्ती करीत आहेत. आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या तिनही वनविभागात अनेक प्रकारचे आकर्षक व दुर्मिळ पक्षी आढळून येत होते.मात्र शिकरीचे प्रमाण वाढल्याचे पशु-पक्ष्यांची संख्या कमालीची घटली आहे. मोठे जंगल असतानाही अत्यंत कमी प्रमाणात पक्षी शिल्लक आहेत. वनविभागाने शिकाऱ्यांकडे लक्ष न दिल्यास पशु-पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे.
मांसासोबतच विषाचेही सेवन
पक्ष्याची शिकार केल्यानंतर त्याच्या शरिरामध्ये असणाºया आतड्या व इतर अवयव फेकून दिले जातात. त्यानंतर त्याचे मांस शिजवून सेवन केले जाते. आतड्या व इतर अवयव फे कून दिल्याने त्यामध्ये विष राहत नाही असा दावा संबंधित शिकाऱ्याकडून केला जात असला तरी काही प्रमाणात विष शिल्लकच राहते असे तज्ज्ञांचे मत आहे. यावरून शिकाऱ्याचे कुटुंब पक्ष्याच्या मांसासोबतच विषाचेही सेवन करीत आहे. एखादे दिवशी जास्त पक्ष्यांची शिकार झाल्यास काही पक्षी इतर नागरिकांनाही विकले जातात. विक्री करतेवेळी संबंधीत ग्राहकाला पक्ष्याची शिकार विष टाकून केली नसून बंदुक, गुल्यार, जाळे, टोपली आदींच्या माध्यमातून केली जात असल्याचे सांगीतले जाते. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ग्राहक विषयुक्त पक्षी खरेदी करतो. या पक्ष्याच्या मांसाचे सेवन केल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.