जनआरोग्य योजना ग्रामीणांसाठी मृगजळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:56 AM2018-08-05T00:56:54+5:302018-08-05T00:57:34+5:30
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव रुग्णालय संलग्न आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत उपचार करायचा असल्यास जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली गाठावे लागते. अशा स्थितीत ग्रामीण गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना फोल ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव रुग्णालय संलग्न आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत उपचार करायचा असल्यास जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली गाठावे लागते. अशा स्थितीत ग्रामीण गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना फोल ठरत आहे.
गरीब व्यक्तींवर खासगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व्हाव्या, या उद्देशाने १ जुलै २०१२ रोजी शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. १ एप्रिल २०१७ रोजी या योजनेचे नाव बदलवून ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ असे ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी राशनकार्डधारकांना सुमारे दीड लाख रूपयांपर्यंतच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला जातो.
शासनाने राज्यातील नागरिकांचा विमा काढला असून शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीवर सोपविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही योजना १ जुलै २०१२ पासून सुरू झाली आहे. विमा कंपनीसोबत संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातात. विमा कंपनीसोबत रुग्णालय संलग्न होण्यासाठी संबंधित रुग्णालयाची बेड क्षमता ३० पेक्षा अधिक असावी, २४ तास एमबीबीएस डॉक्टर व सर्जन उपलब्ध असावे, आयसीयूची व्यवस्था असावी, अशा अटी आहेत. आरमोरी, अहेरी व कुरखेडा येथील रुग्णालये तसेच नव्यानेच झालेले महिला व बाल रुग्णालय या अटी व शर्तींमध्ये बसू शकतात. ही रुग्णालये संलग्न झाल्यास त्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास मदत होईल. जनआरोग्य योजनेतून प्राप्त झालेल्या पैशातून रुग्णालयात पुन्हा चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. मात्र गडचिरोली येथील केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयच कंपनीसोबत संलग्न आहे. त्यामुळे याच रुग्णालयात रुग्णांवर उपचार होतात. परिणामी जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली येथे यावे लागते किंवा मोठी शस्त्रक्रिया असल्यास वर्धा किंवा नागपूर गाठावे लागते. अहेरी, आरमोरी व कुरखेडा रुग्णालयात जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार झाल्यास नागरिकांचा ये-जा करण्याचा त्रास वाचण्यास मदत होईल.
६ हजार ४६८ रुग्णांवर शस्त्रक्रिया
योजनेच्या सुरुवातीपासून गडचिरोली जिल्ह्यातील ६ हजार ४६८ रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यावर १४ कोटी ८५ लाख २९५ रूपये खर्च झाले आहेत. यातील २ हजार ३४४ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यासाठी रुग्णालयाला २ कोटी ६२ लाख ९३ हजार रूपये देण्यात आले आहेत. इतर उपजिल्हा रुग्णालय या योजनेसोबत संलग्न झाल्यास त्यांना शस्त्रक्रियेचे पैसे मिळतील. यातून रुग्णालयात सोयीसुविधा उभारणे शक्य होणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.
आरोग्यमित्रांची संख्या घटली
योजनेला सुरुवात झाली त्यावेळी २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ४५ पीएचसी, ९ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे ५७ आरोग्यमित्र कार्यरत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाला सदर आरोग्यमित्र या योजनेविषयी माहिती देत होते. त्याचबरोबर त्याला रुग्णालयात भरती करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करत होते. आता मात्र केवळ १६ आरोग्यमित्र कार्यरत आहेत. त्यातही एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, धानोरा येथे आरोग्यमित्र कार्यरत नाही. दुर्गम भागातील नागरिकांना या योजनेविषयी माहिती राहत नाही. त्यांना माहिती देण्याबरोबरच त्यांचे समूपदेशन करण्यासाठी आरोग्यमित्रांची पदे भरणे आवश्यक आहे.
आरमोरी, कुरखेडा व अहेरी उपजिल्हा रुग्णालये विमा कंपनीसोबत संलग्न करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. रुग्णालय संलग्न करण्याच्या बाबी वरिष्ठस्तरावरून केल्या जातात. नव्यानचे झालेले महिला व बाल रुग्णालयसुद्धा संलग्न करण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल.
- डॉ.अनिल रूडे, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली