गडचिरोलीतील चामोर्शी व सिरोंचात मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 06:26 PM2020-04-11T18:26:25+5:302020-04-11T18:27:51+5:30
राज्यात व देशात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी आहे. दिवसेंदिवस तो कमीच होत असल्याने सामाजिक असमतोल निर्माण होण्याचा धोका असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व सिरोंचा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यात व देशात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी आहे. दिवसेंदिवस तो कमीच होत असल्याने सामाजिक असमतोल निर्माण होण्याचा धोका असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व सिरोंचा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. याशिवाय आदिवासीबहुल आणि मागास अशा गडचिरोली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर राज्यातील अनेक जिल्ह्यांपेक्षा अधिक आहे.
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी मागील पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच शासन मुलींसाठी विविध योजना राबवित आहे. त्यामुळे े‘मुलगा हा वंशाचा दिवा’ ही संकल्पना मागे पडून ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ ही संकल्पना रूढ होत चालली आहे. तसेही गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मुलगा व मुलगी यांच्यामध्ये कोणताही भेदभाव करीत नाही. त्यामुळे मुलाप्रमाणेच मुलीच्या जन्माचेही या कुटुंबांमध्ये स्वागत केले जाते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक राहत आला आहे.
एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील दर हजार मुलांमागे मुलींचा सरासरी जन्मदर ९५२ एवढा आहे. चामोर्शी तालुक्यातील मुलींचा जन्मदर दरहजार मुलांमागे १०४० तर सिरोंचा तालुक्यातील मुलींचा जन्मदर १०४५ एवढा आहे. उर्वरित अहेरी तालुक्यात हा जन्मदर ९८१, आरमोरी ९३०, धानोरा ७४९, एटापल्ली ९५८, गडचिरोली ९५९, कोरची ९५२, कुरखेडा ९८१, मुलचेरा ९७५, तर देसाईगंज तालुक्यात ८४६ एवढा आहे. आधुनिकीकरणामुळे नष्ट होत चाललेले जंगल आणि कमी होत असलेली मुलींची संख्या, या दोन्ही गोष्टी गडचिरोली जिल्ह्यात जोपासल्या जात आहेत.