दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील ५० विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा
By admin | Published: November 1, 2015 01:54 AM2015-11-01T01:54:34+5:302015-11-01T01:54:34+5:30
जिल्ह्याच्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातून शिक्षणाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातून येऊन भामरागड येथील वसतिगृहात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
भामरागडात कार्यक्रम : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा पुढाकार
प्रतीक मुधोळकर अहेरी
जिल्ह्याच्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातून शिक्षणाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातून येऊन भामरागड येथील वसतिगृहात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा गरीब व एकाकी वसतिगृहात राहणाऱ्या ५० विद्यार्थ्यांचा एकत्रित वाढदिवस शुक्रवारी भामरागडातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला.
भामरागड तालुक्यातील दुर्गंम भागातून येऊन वसतिगृहात विद्यार्थी आपल्या घरापासून दूर राहतात. त्यामुळे सण असो किंवा आपला वाढदिवस ते साजरा करू शकत नाही. आपल्या घरापासून दूर असण्याची उणीव भासू नये, यासाठी भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जाधव, संतोष मंथनवार, प्रसन्ना बिट्टूवार यांनी आॅक्टोबर महिन्यात येणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले व त्यानुसार भगवंतराव वसतिगृह व जय पेरसापेन वसतिगृहातील आॅक्टोबर महिन्यात वाढदिवस असणाऱ्या ५० विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आठ किलोचे दोन केक कापून त्यांना दीर्घ आयुष्याचे कामना करण्यात आली. यावेळी प्रत्येकाला मिठाई, पेन देण्यात आले. आपल्या जीवनात पहिल्यांदाच वाढदिवस साजरा करण्यात येत आहे व आम्ही खुप आनंदी आहोत, असे मनोगत विद्यार्थ्यांनी यावेळी बोलून दाखविले.
सदर उपक्रम प्रत्येक महिन्याला राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातर्फे दोन्ही वसतिगृहात जाऊन प्रोजेक्टरवर थोर पुरुषांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखविण्यात येणार आहे. दिवाळी सुट्यांमध्ये विद्यार्थी घरी जात असल्याने त्यांना फराळाचेही वाटप केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही गरज पडल्यास उपविभागीय कार्यालय सदैव मदतीस तत्पर राहणार, असे आश्वासन एसडीपीओ संदीप गावित यांनी विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाप्रसंगी दिले.