भाजप व काँग्रेसलाही बंडखोरीचे ग्रहण
By admin | Published: October 17, 2015 01:59 AM2015-10-17T01:59:04+5:302015-10-17T01:59:04+5:30
कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठे घमासान सुरू झाले.
कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठे घमासान सुरू झाले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर पंचायती तीन प्रभागात तर काँग्रेसकडून दोन प्रभागात दोन-दोन उमेदवारांनी आपली दावेदारी सादर करीत नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे कुरखेडा नगर पंचायतीत भाजप व काँग्रेस पक्षात बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
१७ सदस्यीय कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व हे स्थानिक असल्याने त्यांच्या निर्णयाला कोणतेच आव्हान नव्हते. त्यामुळे शिवसेनेत तिकीट वाटपात असंतोष निर्माण झाला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीचे मोजकेच दावेदार असल्याने पक्ष नेतृत्वाला तिकीट वाटपात काही अडचण आली नाही. राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षात सध्या एकजुटीचे वातावरण आहे. मात्र भारतीय जनता पार्टी व काँग्रेस याला अपवाद आहे. भाजपातर्फे प्रभाग क्र. १ मध्ये गणपत सोनकुसरे व रामहरी उगले तर प्रभाग क्रमांक ७ मधून अॅड. उमेश वालदे व मुन्ना सहारे, प्रभाग क्रमांक ९ मध्ये मनीष शर्मा व वामदेव सोनकुसरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीकरिता दावेदारी सादर केली. काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक १३ मध्ये जयश्री धाबेकर व खान रजिया बानो तर प्रभाग क्र. १४ मध्ये विमल हलामी व शाहेदा मुगल यांनी दावेदारी सादर केली. दोन्ही पक्षाचे सर्व दावेदार उमेदवार पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असल्याने पक्षश्रेष्ठीपुढे नगर पंचायत निवडणुकीत गंभीर पेच निर्माण झाला होता. अखेरच्या क्षणापर्यंत अनिर्णयाची परिस्थिती होती. १२ आॅक्टोबर ही पक्षाचा एबी फॉर्म सादर करण्याची अंतिम मुदत होती. अखेर निर्णय घेत दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांनी पक्षाचा एबी फॉर्म उमेदवाराच्या हातात न देता थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. मात्र ज्यांचा दावा नाकारण्यात आला त्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना पक्षाच्या या निर्णयाची कुणकुण लागली असल्याने सध्या कुरखेडाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नामांकन अर्ज परत घेण्याची मुदत ही २३ आॅक्टोबरपर्यंत आहे. या कालावधीत असंतुष्टांची मनधरणी करण्याचा पक्ष नेत्यांकडून जोरदार प्रयत्न होत आहे. मनधरणी करण्याच्या कामात भाजप नेतृतव अधिक सक्रीय असल्याने काही प्रभागात बंडखोरी टाळण्यात भाजप नेत्यांना यश येण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे दोन्ही प्रभागात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या प्रभागात काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. (तालुका प्रतिनिधी)