भाजपने फुंकला निवडणुकीचा बिगूल
By admin | Published: June 30, 2016 01:28 AM2016-06-30T01:28:18+5:302016-06-30T01:28:18+5:30
आगामी काळात नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
बैठकीला ३०० सदस्य उपस्थित : अनेक राजकीय ठराव पारित; जिल्हा विकासाचे दिले आश्वासन
गडचिरोली : आगामी काळात नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक गडचिरोली येथे गुरूवारी पार पडली. या बैठकीत जिल्हा विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आगामी काळात जिल्हा विकासाचे कोणते प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत. याबाबत राजकीय ठराव पारित करण्यात आले. एकूणच, भाजपची ही बैठक आगामी निवडणुकीच्या बाबत जनतेला ठोस विकासाचे आश्वासन देणारीच होती. हे एकूणच, राजकीय ठरावावरून दिसून येत आहे.
स्थानिक सुप्रभात मंगल कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपच्या अल्पसंख्यंक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी जमाल शेख, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, रवींद्र बावनथडे, रमेश भुरसे, सुधाकर येनगंधलवार, बाबुराव कोहळे, किसन नागदेवे, नाना नाकाडे, मोतीलाल कुकरेजा, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, प्रशांत भृगुवार आदी मंचावर उपस्थित होते.
भारतमाता, पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भाजपच्या जिल्हा बैठकीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात त्यांनी भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत.
शासनाच्या सदर कल्याणकारी योजनांची माहिती भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावांत लोकांपर्यंत पोहोचवावी. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग व सिंचन प्रकल्पाचे काम मंजूर करण्यात आले आहे. गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम गतीने सुरू आहे. भाजप सरकारची वाटचाल चांगली सुरू असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविण्यासाठी भाजपचे संघठन मजबूत करावे, असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बाबुराव कोहळे यांनी या बैठकीत राजकीय प्रस्ताव ठेवला. त्यावर संपूर्ण बैठकीत चर्चा होऊन भाजपने निवडणुकीचे रणशिंग या निमित्ताने फुंकले. (जिल्हा प्रतिनिधी)
सूरजागड प्रकल्पाला भाजपचे जोरदार समर्थन
सूरजागड प्रकल्पाचे जोरदार समर्थन राजकीय ठरावाद्वारे भारतीय जनता पक्षाने केले असून एटापल्ली, सूरजागड येथे सीआरपीएफचे चार बटालियन येत आहेत. तसेच सीबीएससीची शाळा व नवीन दवाखाना निर्माण केला जाणार आहे, असे स्पष्ट संकेत या बैठकीत भाजपने दिले.
गडचिरोली नगर पालिकेच्या चार वर्षांच्या कामावर जोरदार टीका
गडचिरोली नगर पालिकेचा कारभार ठेकेदार, नगरसेवकांनी चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. नगर पालिका लुटून खाण्यात आली. गेल्या चार वर्षात कुठेही बगिचा व चांगले विकास काम सत्ताधाऱ्यांना करता आले नाही, अशी टीका भाजपने केली आहे. पालकमंत्री व आमदार, खासदारांच्या फंडातून झालेल्या कामाचे श्रेय नगर परिषदेचे सत्ताधारी घेत असल्याचा आरोपही राजकीय ठरावातून भाजपने केला.
मुख्यमंत्री घालणार प्रश्नांवर लक्ष
भविष्यकाळात चव्हेला, मेडिगड्डा धरणाच्या पाण्यामुळे जिल्ह्याला सिंचनाचा लाभ होईल, सूरजागड प्रकल्पाच्या निर्मितीमुळे बेरोजगारीची समस्या सुटेल, गैर आदिवासींना जमिनीचे पट्टे, गाईम्हशींचे वाटप, मत्स्यपालन, कुकुटपालन, वराहपालन, शेळीपालन व कमी करण्यात आलेले गैर आदिवासींचे आरक्षण आदी मुद्यांवर मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत आहेत. लोकप्रतिनिधींचा सतत पाठपुरावा या प्रश्नावर सुरू असल्याचे भाजपने म्हटले आहे. मुख्यमंत्री या प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत, असेही भाजपने म्हटले आहे.