भाजप सरकार कामगार विरोधी
By admin | Published: May 1, 2017 02:14 AM2017-05-01T02:14:25+5:302017-05-01T02:14:25+5:30
सध्याचे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार हे कामगार, कष्टकरी व शेतकरीविरोधी असून भांडवलदाराच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे.
श्याम काळे यांचा आरोप : आयटकचे जिल्हा अधिवेशन
गडचिरोली : सध्याचे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार हे कामगार, कष्टकरी व शेतकरीविरोधी असून भांडवलदाराच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे कामगारांनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन आयटकचे राज्य सचिव श्याम काळे यांनी केले.
आयटकचे दुसरे जिल्हा अधिवेशन गडचिरोली येथे रविवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या राज्य सरचिटणीस अॅड. माधुरी क्षिरसागर, डॉ. महेश कोपुलवार, देवराव चवळे, विनोद झोडगे, जलील खान पठाण, बी. के. नाकतोडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी माधुरी क्षिरसागर म्हणाल्या, सध्याचे सरकार हे महिला विरोधी असून आयटक ही संघटना केवळ कामगारांच्या मानधन वाढीसाठी लढणारी संघटना नसून समाजातील अत्याचार, शोषण, भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारी संघटना आहे. डॉ. महेश कोपुलवार म्हणाले, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाकडून दडपशाहीचे धोरण अवलंबिले जात आहे. हे लोकशाहीविरोधी आहे, असे ते म्हणाले. अधिवेशनाच्या सुरूवातीला इंदिरा गांधी चौकातून पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनापर्यंत रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवराव चवळे, संचालन विनोद झोडगे यांनी केले तर आभार अॅड. जगदिश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सपना रामटेके, रूपा पेंदाम, कौसल्या गोंधोळे, बसंती अंबादे, कुंदा चलिरवार, रजनी गेडाम, किरण गजभिये, विनोद बन्सोड, लता नंदेश्वर, प्रकाश ठलाल आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी आयटकची गडचिरोली जिल्हा कार्यकारीणी घोषीत करण्यात आली.
सदर अधिवेशनात देवराव चवळे, विनोद झोडगे यांनी संघटनेचा अहवाल मांडला. तसेच याप्रसंगी ग्रामसभेचे जि.प. सदस्य अॅड. लालसू नरोटी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आयटकचे पदाधिकारी, सदस्य तसेच अंगणवाडी सेविका व मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)