भाजप सरकार शेतकरीविरोधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:36 AM2018-08-22T00:36:05+5:302018-08-22T00:36:27+5:30
संपुआ सरकारच्या काळात कच्या तेलाचे दर आजच्यापेक्षा अधिक असताना पेट्रोल, डिझेलचे दर मात्र आजच्या तुलनेत कमी होते. सध्यास्थितीत कच्चा तेलाचे दर जास्त आहेत किंबहूना ते रोजच वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून भाजपप्रणीत सरकार गरीबांच्या खिशातला पैसा काढुन देशातील निवडक धनदाडग्यांची घरे भरीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : संपुआ सरकारच्या काळात कच्या तेलाचे दर आजच्यापेक्षा अधिक असताना पेट्रोल, डिझेलचे दर मात्र आजच्या तुलनेत कमी होते. सध्यास्थितीत कच्चा तेलाचे दर जास्त आहेत किंबहूना ते रोजच वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून भाजपप्रणीत सरकार गरीबांच्या खिशातला पैसा काढुन देशातील निवडक धनदाडग्यांची घरे भरीत आहे. विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरीविरोधी आहे, अशी घणाघाती टिका काँग्रेसच्या आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केली.
आरमोरी तालुका काँग्रेसच्या वतीने आरमोरी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते
याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किशोर वनमाळी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस समशेरखॉ पठाण, डॉ. नितीन कोडवते, पं. स. सभापती बबिता उसेंडी, माजी सभापती अशोक वाकडे, पं. स. सदस्य वृंदा गजभिये, किरण मस्के, नामदेव सोरते, प्रभाकर टेंभुर्णे, महेश तितिरमारे, मधुकर चौधरी, शालीक पत्रे, जुम्मनभाई शेख, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष नीलकंठ सेलोकर, श्रीनिवास आबंटकर, अकुंश गाढवे, अशोक भोयर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी लागणारे खत व किटकनाशकांच्या भावात विद्यमान सरकारने प्रचंड वाढ केली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. विद्यमान सरकार बड्या उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेत आहे, असा आरोप गेडाम यांनी केला.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मधुकर चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शालीक पत्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शक्ती प्रोजेक्टवर नोंदणी केली. यावेळी आरमोरी शहरातील सर्व वॉर्डातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा काँग्रेस आदिवासी सचिव दिलीप घोडाम तर आभार आरमोरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मिलींद खोब्रागडे यांनी मानले.