कार-ट्रॅक्टरची भीषण धडक, भाजप नेत्याचा जागीच मृत्यू; ट्रॅक्टरचे दोन तुकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 03:54 PM2022-01-27T15:54:36+5:302022-01-27T16:42:27+5:30
ट्रॅक्टर व कारची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात भाजप नेते आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी झालेत.
गडचिरोली : ट्रॅक्टर व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चामोर्शी येथील भाजप नेते व ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अतुल गण्यारपवार हे गंभीररित्या जखमी झाले. ही घटना आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील रणमोचन फाट्याजवळ गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य व चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार व त्यांचे भाऊ आनंद गण्यारपवार हे दोघे कारने चामोर्शीहुन ब्रम्हपुरीमार्गे नागपूरला जात होते. दरम्यान, ब्रम्हपूरी तालुक्यातील रणमोचन फाट्याजवळ समोरुन येणारा ट्रॅक्टर व कारची धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. यात आनंद गण्यारपवार हे जागीच गतप्राण झाले तर, त्यांचे भाऊ अतुल गण्यारपवार तर अतुल गण्यारपवार यांच्या मानेला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. कारचालकालाही किरकोळ इजा झाली असल्याचे समजते. तर ट्रॅक्टरचालकालासुद्धा किरकोळ मार लागला. मात्र, तो घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आनंद गण्यारपवार यांच्या अवकाळी मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. अपघाताची माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे भाजप नेते माजी आमदार अतुल देशकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आणि अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आनंद गण्यारपवार यांच्या अपघाती निधनानंतर तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.