मताधिक्य मिळताच भाजप कार्यालयात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:13 AM2019-05-24T01:13:18+5:302019-05-24T01:14:35+5:30
दिवसभर कार्यकर्त्यांनी गजबजून राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंत शुकशुकाट होता. खासदार अशोक नेते कार्यालयात येतील या आशेने सायंकाळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा कार्यालयात पोहोचला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिवसभर कार्यकर्त्यांनी गजबजून राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंत शुकशुकाट होता. खासदार अशोक नेते कार्यालयात येतील या आशेने सायंकाळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा कार्यालयात पोहोचला. जल्लोष करण्यासाठी बँडसुद्धा बोलविण्यात आला. मात्र रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्ते व नागरिकांनी शेवटी घराची वाट धरली.
भाजप व काँग्रेस यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. त्यामुळे निकालाच्या दिवशी सकाळी भाजप कार्यकर्त्यांच्या चेहºयावर चिंता दिसून येत होती. ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते थोडावेळ भाजप कार्यालयात थांबत होते. त्यानंतर ते थेट मतमोजणी केंद्राकडे निघत होते. सकाळी १०.२० वाजता पहिल्या फेरीचा निकाल घोषित होऊन, त्यामध्ये खासदार अशोक नेते आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहºयावर थोडेफार हास्य दिसून लागले. कार्यालयात बसलेले कार्यकर्ते फोनवरून प्रत्येक फेरीचा निकाल जाणून घेत होते. प्रत्येक फेरीत खासदार नेते आघाडी मिळवत असल्याचे बघून कार्यकर्तेही आनंदी होत होते.
११ व्या फेरीचा निकाल सायंकाळी ४.१५ वाजता घोषित झाला. त्यामध्ये खासदार नेते यांना ६२ हजारांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याने सायंकाळी ५ वाजतानंतर या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी जमा होण्यास सुरूवात झाली. कार्यालयाच्या मागे असलेल्या खुल्या जागेवर खुर्च्या लावण्यात आल्या.
विजय निश्चित झाल्यानंतर खासदार नेते सायंकाळी कार्यालयात येणार होते. त्यामुळे आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे आदी भाजप कार्यालयात पोहोचले. परंतू खासदार नेते मतमोजणीच ठिकाणावरून हलले नाही. खासदार अशोक नेते यांच्या विजयासाठी आपण कसकसे प्रयत्न केले, हे एकमेकांना सांगितले जात होते. काही कार्यकर्ते खासदार नेते हे निवडून येणारच होते, असेही सांगण्यास मागे-पुढे पाहत नव्हते. विजयोत्सव साजरा करण्यासाठी परवानगीही मागण्यात आली. परंतू पोलिसांनी आज बंदोबस्ताची मर्यादा पाहून उद्या मिरवणूक काढण्याचा सल्ला दिला.
सकाळपासूनच पोलीस जवानांचा पहारा
निकालाच्या दिवशी सकाळपासूनच गडचिरोली शहरातील वातावरण तंग असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी भाजप कार्यालयात सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधूनमधून भेटी देऊन
पोलीस विभागाचे अधिकारी सुरक्षेचा आढावा घेत होते.