भाजपला लागले ‘लोकसभा २०१९’चे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2017 02:20 AM2017-05-26T02:20:37+5:302017-05-26T02:20:37+5:30
येत्या दोन वर्षानंतर (२०१९) येणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुथस्तरापर्यंत पक्षाला बळकटी
पक्ष बळकटीकरणावर भर : पं.दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी व कार्यविस्तारातून मतदारांना जोडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येत्या दोन वर्षानंतर (२०१९) येणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुथस्तरापर्यंत पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमातून आणि कार्य विस्तार योजनेतून मतदारांपर्यंत शासनाच्या योजना आणि झालेली विकास कामे पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते यांनी गुरूवारी दिली.
बुधवारी गडचिरोलीत भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची विस्तीर्ण बैठक झाली. त्यात कार्य विस्तार योजना समितीच्या प्रमुखपदी बाबुराव कोहळे व सहप्रमुख म्हणून रवी ओल्लालवार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीच्या प्रमुखपदी प्रकाश अर्जुनवार आणि सहप्रमुख म्हणून डॉ.भारत खटी यांची नियुक्ती केल्याची माहिती यावेळी खासदार नेते यांनी दिली.
कार्य विस्तार योजनेअंतर्गत २९ मे ते १२ जून यादरम्यान जिल्ह्यातील ९०४ बुथवर प्रतिबुथ १० कार्यकर्ते आणि १ प्रमुख अशा ११ लोकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ३ प्रकारचे विस्तारक नेमले जाणार आहेत.
कार्य विस्तार योजनेअंतर्गत सर्व विस्तारक आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी किमान १५ दिवस पक्षकार्यासाठी स्वत:ला वाहून घ्यायचे आहे. याशिवाय पं.दिनदयाल जन्मशताब्दी समारोहाअंतर्गत रक्तदान शिबिर, वृक्षारोपण अशा काही सामाजिक उपक्रमांसह पं.दिनदयाल यांचे स्टीकर्स व फोटो गावागावो जाऊन घरोघरी लावले जाणार आहेत.
या पत्रपरिषदेला गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपनगराध्यक्ष अनिल कुनघटकर, भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, डॉ.भारत खटी, प्रमोद पिंपरे, रमेश भुरसे, पं.स.उपसभापती विलास दशमुखे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जावेद अली आदी प्रामुख्याने उपस्थित होते.