भाजपाने निवडणुकीतील वचन पाळावे
By admin | Published: November 13, 2014 11:02 PM2014-11-13T23:02:35+5:302014-11-13T23:02:35+5:30
निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र विदर्भ देण्याचे आश्वासन विदर्भातील जनतेला दिले. भाजपाचे आता केंद्र व राज्यात शासन आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन भाजपाने
पत्रकार परिषद : वामनराव चटप यांचे सरकारला आवाहन
गडचिरोली : निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र विदर्भ देण्याचे आश्वासन विदर्भातील जनतेला दिले. भाजपाचे आता केंद्र व राज्यात शासन आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन भाजपाने पाळून स्वतंत्र विदर्भ राज्य करावे, असे आवाहन माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले.
स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन भाजपाने दिल्याने विदर्भातील जनतेने भाजपावर विश्वास ठेवत सर्वाधिक ४४ आमदार विदर्भातून निवडून दिले. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मुदत ३१ मार्च २०१५ ला संपत आहे. या महामंडळाची मुदत वाढवून देण्यापूर्वीच केंद्राने स्वतंत्र विदर्भाची घोषणा करावी. विदर्भाचा अनुशेष हजारो कोटींच्या घरात आहे. केंद्र व राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर नजर टाकल्यास विदर्भासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देणे अशक्य आहे. विदर्भातील साधन संपत्तीचा वापर करून पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आहे. यानंतर विदर्भातील साधन संपत्तीची लुट थांबविणे आवश्यक आहे. यासाठी तीव्र लढा उभारला जाईल. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन १३ व १४ डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा लढा उभारण्याविषयी व्यापक चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिली. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, राम नेवले, नंदा पराते, रमेश भुरसे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)